अयोध्याप्रसाद गावकर -- देवगड-जामसंडे नगरपंचायतीची निवडणूक काँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढविण्यासाठी चाचपणी करत आहेत. नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांमधून प्रमुख पक्षांकडून सतराही उमेदवारांची यादी वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आली आहे. काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी देवगडात भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महायुती होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.देवगड-जामसंडे नगरपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन महिने उलटून गेले तरी निवडणुकीची तारीख अद्यापही निश्चित नसल्याने राजकीय पक्षांकडून प्रभागनिहाय उमेदवारही अद्याप निश्चित झालेले नाहीत. यामुळे इच्छुकांना आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. तसेच उमेदवारी निश्चित नसल्याने मतदारांच्या गाठीभेटी कशा घ्यायच्या असा प्रश्नही त्यांच्यासमोर पडला आहे. यामुळे गणेश चतुर्थीच्या काळात इच्छुकांना मतदारांच्या गाठीभेटी घेणे शक्य झाले नाही.काँग्रेस पक्षही स्वबळावरती निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून गेले तीन महिने मोर्चेबांधणी करत असून त्यादृष्टीकोनातून त्यांचे कामकाज सुरू आहे. आमदार नीतेश राणे यांनी देवगड-जामसंडे भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेणे, तेथील समस्या जाणून घेणे व मतदारांपर्यंत पोहोचणे यामध्ये आघाडी घेतली आहे. तसेच भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार व अजित गोगटे यांनीही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर व राष्ट्रवादीचे नंदकुमार घाटे यांनीही जनतेपर्यंत पोहोचून जनतेची मते आजमावण्याच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. आगामी नवरात्रोत्सवामध्ये सर्वच पक्षांची नेतेमंडळी देवगडमध्ये दाखल होणार असल्याने यानंतरच खऱ्या अर्थाने नगरपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.देवगड आनंदवाडी प्रकल्पालाही राज्यशासनाने ५० टक्के निधीची मंजुरी दिली असून उर्वरित ५० टक्के निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ५० टक्के निधीला मंजुरी मिळताच आनंदवाडी प्रकल्पाला खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळणार आहे. यामुळे शिवसेना-भाजपाकडून देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात हा प्रमुख मुद्दा असणार आहे. मालवण-तोंडवळी येथील सी-वर्ल्ड प्रकल्प देवगड येथे हलविण्याच्या दृष्टीकोनातूनही भाजप प्रयत्न करत असल्याने त्याबाबत श्रेय घेऊन निवडणूक प्रचारामध्ये हा एक प्रमुख मुद्दा मिळतो की काय असाही प्रयत्न केला जात आहे.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेचे कॅबिनेटमंत्री देवगड तालुक्यातील सुपुत्र असल्याने या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांच्यासह अनेक नेतेमंडळी देवगडात येण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना या निवडणुकीत प्रचारासाठी आणण्यात येणार आहे.विनोद तावडे यांनी गणेश उत्सवामध्ये देवगड-जामसंडे भागात गणेश दर्शन घेऊन प्रचाराला अप्रत्यक्षरित्या सुरुवातच केली आहे. यामुळे शिवसेना-भाजपाची सत्ता असल्याने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रचाराला बहुतांश मंत्री प्रचारासाठी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचा फायदा शिवसेना-भाजपाला किती मिळतो हे येणारा काळच ठरविणार आहे. आमदार नीतेश राणे यांनी आमदार झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात देवगडमध्ये विकासाची अनेक कामे केली आहेत. तसेच वेळोवेळी विविध समस्यांसाठी आंदोलनासारखे मार्ग अवलंबिल्यामुळे देवगड-जामसंडे भागामध्ये त्यांचाही प्रभाव दिसून येत आहे. प्रत्यक्षात निवडणुकीची तारीख जाहीर होताच खऱ्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. एकूणच देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूक चित्तवेधक ठरणार आहे.जागा वाटपानंतरच महायुती होणारभाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. देवगडमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या तिन्ही पक्षांचा प्रभाव आहे. जामसंडेमध्ये बहुतांश प्रमाणात भाजपचा वरचष्मा आहे. यामुळे जागा वाटप कशा पद्धतीने होते यावरच महायुती निश्चित होणार आहे.
काँग्रेसला रोखण्यासाठी महायुतीची शक्यता
By admin | Published: September 19, 2016 11:23 PM