सावंतवाडी : येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर आला आहे. असे असताना ही दुकाने हटविणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी निवेदनातून केला आहे.या निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. या कालावधीत अनधिकृत बांधकामे तसेच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाने स्थगितीचे आदेश दिले असताना सावंतवाडी पालिकेने येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकाने हटविली.
या कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. बहुतांश छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, फेरीवाले असे अनेक गरीब लोक अडचणीत सापडले आहेत.मात्र, तरीही येथील पालिकेने लॉकडाऊन काळात शासनाचे अध्यादेश झुगारून २५ ते ३० वर्षे व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने अतिक्रमण केल्याचे कारण पुढे करून काढून टाकली आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच लॉकडाऊन आहे. गणेश चतुर्थी सणही काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत गरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचा हा प्रकार पालिकेने केला आहे.या कारवाईला मुख्यमंत्री म्हणून आपणाकडून तत्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्य नगर विकास मुख्य सचिव, कोकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.गाळे मालकांना न्याय द्यावा : सुनील पेडणेकरसावंतवाडीत जी दुकाने आहेत ती पूर्वीपासूनची आहेत. त्यांना आताच का हटविण्यात आले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला आहे. मग ही दुकाने हटवित असताना याचा तरी विचार केला गेला पाहिजे होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून दुकान गाळे मालकांना तसेच विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणीही सुनील पेडणेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.