चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात खताचा तुटवडा असताना चिपळूणमध्ये मात्र मुबलक खत उपलब्ध झाले आहे. येथील खरेदी विक्री संघाने ३१ मे पूर्वी १६०० टन खत विक्री केली आहे. हा एक उच्चांक असल्याचे खरेदी विक्री संघातर्फे सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी खरेदी विक्री संघातर्फे भात बियाणे व खत विक्री केली जाते. यावर्षी ९०० क्विंटल भात बियाणांची विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च प्रतिचे बियाणे उपलब्ध झाले. भाताबरोबरच तालुक्यात १६०० टन खत वाटप करण्यात आले. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये खत पाठविले जाते. तर सोसायटीच्या माध्यमातून खताची विक्री होते. खताची सर्वांत जास्त विक्री चिपळूण तालुक्यात झाली आहे. यामध्ये युरिया, निमकोरडे युरिया, सुफला १५:१५:१५, कृषी उद्योग १८:१८:१०, एमओपी न्युरेटिका पोटॅश, पावर १६:१६:१६, समर्थ १०:२६:२६, संपुर्णा १९:१९:१९, एसएसपी, तसेच सर्व प्रकारचे सेंद्रिय खते येथे विक्री करण्यात आली व पाण्यात विरघळणारी खतेही येथे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे सहाय्यक व्यवस्थापक पी.बी. कांबळे यांनी केले आहे. चिपळूण तालुका खरेदी विक्री संघामार्फत तालुक्यात मुबलक खत वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. या वितरण व्यवस्थेबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खत पुरवठा करताना खरेदी विक्री संघाच्या कर्मचारी, अधिकारी यांनी याविषयात लक्ष घातल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)शेतकरी वर्गात समाधान जिल्ह्यात खताचा तुटवडा असताना चिपळूण तालुक्यात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी ९०० क्विंटल भातबियाण्याची विक्री करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून १६०० टन खत विकले गेले आहे.
चिपळुणात खताचा मुबलक साठा
By admin | Published: June 24, 2015 12:27 AM