लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : आमसभेत जनतेच्या आलेल्या प्रश्नांबाबत महिनाभरात आढावा बैठक आयोजित करून हे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कुडाळ तालुक्याच्या आमसभेत बोलताना आमदार वैभव नाईक यांनी दिली. या सभेत महामार्गावर पडलेले खड्डे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बुजविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण काहीकाळ तंग होते. मात्र, ही आमसभा खेळीमेळीत पार पडली. कुडाळ पंचायत समितीच्यावतीने कुडाळ तालुक्याची आमसभा आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी येथील महालक्ष्मी सभागृहात झाली. या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश जाधव, पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, तहसीलदार अजय घोळवे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, उपनगराध्यक्ष आबा धडाम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, विकास कुडाळकर व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. (पान १० वर) सभेच्या सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर तालुक्यातील पुरस्कारप्राप्त पत्रकार चंद्रकांत सामंत, दशावतार कलाकार सुधीर कलिंगण तसेच आंदुर्ले, हुमरमळा व वालावल ग्रामपंचायतींच्या आणि जिल्हा परिषदेच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. आमसभेला उपस्थित नागरिकांपैकी रांगणा तुळसुली येथील नागेश आईर यांनी या बैठकीत सविस्तर उत्तरे देण्याची मागणी केली. कारण रस्ते थोडे होतात आणि पूर्ण झाल्याचे सांगितले जाते तसे होऊ नये, अशी मागणी केली. यावर टप्प्याटप्प्याने रस्ते पूर्ण करू, एकाचवेळी पूर्ण होणार नसले तरी जास्तीत जास्त पूर्ण करू, असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. वालावल सरपंच राजा प्रभू यांनीदेखील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच जिल्हा परिषदेकडे निधी तुटपुंजा असतो. काही रस्त्यांवर वारंवार निधी खर्ची घातला जातो, याकडे लक्ष वेधले. महामार्गाचे खड्डे रात्रीच्यावेळी बुजविले जात आहेत. मंत्र्यांसाठी खड्डे बुजवू नका. त्यांना खड्ड्यांतूनच येऊ द्या. गेल्यावर्षी कोणत्या एजन्सीने खड्डे भरले त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली. यावेळी भाजपचे राजू राऊळ बोलत असताना वादंग झाला. जुने काय झाले ते नको, आताचे काय ते बोला, असे सांगत काँगे्रस कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये हस्तक्षेप करीत एजन्सीने नीट काम न केल्यास कारवाई करण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले, तर सतीश सावंत यांनी २४ जूननंतरच खड्डे भरा, असा टोला हाणला. योजनांचे टार्गेट द्या वर्दे येथील दिलीप सावंत यांनी तलाठ्यांना पेन्शनसारख्या योजनांची टार्गेट द्या. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप केला. रोजगार हमी योजनेशिवाय शेतकऱ्यांना विहीर मिळत नाही ती मिळावी, अशी मागणी केली. तहसीलदारांना लोकांच्या भेटीसाठी वेळ देण्याचे आदेश आमदार नाईक यांनी यावेळी दिले.
महामार्गावरील खड्ड्यांवरून आमसभेत खडाजंगी
By admin | Published: June 22, 2017 1:07 AM