सावंतवाडी : सावंतवाडीत विद्युत विभागाने गुरूवारी गनी कुटुंबाला वीज जोडणी दिल्यानंतर शुक्रवारी शेजारी राहणाऱ्या मेहराज गनी यांच्या कुटुंबाने त्यावर आक्षेप घेतला. विद्युत विभागाचे शाखा अभियंता अतुल पाटील यांना जाब विचारत घराची कागदपत्रे नसताना, अनधिकृतपणे विद्युतजोडणी कशी दिली? याचे आम्हाला लेखी द्या, अशी मागणी केली. तसेच काँग्रेसच्या दबावाखातर ही वीजजोडणी दिल्याचा आरोपही यावेळी सुफियान गनी यांनी केला. यावेळी पाटील यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.सावंतवाडीत विद्युत विभागाने गेली दीड वर्षे सिध्दिकी गनी यांना वीजजोडणी न दिल्याने काँग्रेसने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर सिध्दिकी गनी यांना विद्युत विभागाने वीज जोडणी दिली. त्यानंतर शुक्रवारी यावर मेहराज गनी, फराह गनी, सुफियान गनी, तैसिफ गनी, अभिरूद्दीन गनी यांनी आक्षेप घेत शाखा अभियंता अतुल पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही कोणत्या नियमात विद्युतजोडणी दिली ते सांगा. पक्षाच्या दबावाखाली जर विद्युत जोडणी देत असाल, तर मग अनेक जण घरात वीजजोडणी नसल्याने अंधारात आहेत. त्यांनाही वीज जोडणी द्या. ज्या घराला नगरपालिकेने पाडण्याचे आदेश दिले आहेत, तसेच त्यांच्याकडे योग्य ती कागदपत्रे नाहीत. मग अशांना तुम्ही कशी काय वीजजोडणी देता, असा सवालही गनी कुटुंबाने केला आहे. त्यामध्ये काही बाबीचा उल्लेख नसल्याने पुन्हा गनी यांनी पाटील यांना धारेवर धरले. त्यावेळी घराचा नंबर एक आणि दुसऱ्या नंबरवरून ही वीज जोडणी दिल्याचे स्पष्ट झाले. अखेर गनी कुटुंबाने या विरोधात आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे आंदोलन मिटवले असले तरी हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गरीबांची छळवणूक : वरिष्ठांकडे दाद मागणारतसेच वीज जोडणी कशी दिली, याचे आम्हाला लेखी उत्तर द्या. त्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही, असा पवित्राही गनी कुटुंबाने घेतला. यावेळी महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या होत्या. तुम्ही पैसे घेऊन गरीब लोकांची छळणूक करीत असून, याविरोधात आम्ही वरिष्ठ पातळीवर दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आम्हाला लेखी उत्तर द्या, अशी मागणी केली. यावेळी शाखा अभियंता पाटील यांनी आम्ही पूर्ण कागदपत्राच्या आधारेच ही वीजजोडणी दिली असल्याचे लेखी उत्तर दिले.
दबावाखातर वीज जोडणी
By admin | Published: November 20, 2015 9:13 PM