अनंत जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या स्वभावानुसार काँग्रेस नेत्यांवर टीका करणार हे गृहीत आहे. यावर उपाय म्हणून प्रदेश काँग्रेसकडून टीकेला उत्तर न देता मौन धारण करण्याची रणनीती आखण्यात आली असून, याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याचे निर्देशही नूतन जिल्ह्याध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. यामुळे राणे पक्षातून गेले तर काँग्रेसवर याचा कोणताही फरक पडत नाही हेही दिसून येईल आणि राणेंच्या आरोपातील हवा निघून जाईल, असे मानले जात आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेस सोडणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू आहे. मात्र, आता राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश लक्षात घेता काँग्रेसनेही तशी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यापूर्वी प्रदेश काँग्रेसच्यावतीने एक शिष्टमंडळ जिल्ह्यात पाठविले होते. मात्र, यावेळी झालेल्या बैठकीत राणे समर्थकांनीच प्रदेश स्तरावरून आलेल्या नेत्यांना धारेवर धरत ही बैठक हायजॅक केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपही यावेळीआमदार नीतेश राणे यांनी केला होता.या बैठकीचा अहवाल खासदार हुसेन दलवाई यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. या अहवालानुसार अखिल भारतीय काँग्रेसने शनिवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. ही बरखास्ती राणे यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच राणे यांनी आपल्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांना घेतले आहे.मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर न देण्याची रणनीती कॉँग्रेसने आखली आहे..यामुळे राणेच्या आरोपातील हवा निघून जाईल. राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, हेही यातून दिसून येईल, अशी पक्षाची भूमिका आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टीकेला उत्तर देत नसून, त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे.प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसची जशी रणनीती असेल, तसे आम्ही काम करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. राणे किंवा अन्य नेत्यांनी आपल्यावर योकाचे व्यक्तिगत पातळीवरचे आरोप केले तर त्याचा खुलासा मात्र करणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.चौकटरणनीती नाही, मात्र आम्ही ठरविले : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणनारायण राणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही त्यांनी पक्षावर टीका केली तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. ही रणनीती नाही, मात्र आम्ही तसे ठरविले आहे. पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सिंधुदुर्गमध्ये सभासद नोंदणी झाली नाही. याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे आल्या होत्या. ही नोंदणी न होणे म्हणजे तेथे पक्षाचे काम नसल्याचे लक्षण आहे. मात्र, आता नवीन अध्यक्ष दिले आहेत. ते चांगल्याप्रकारे काम करतील, अशी आशा यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केली.
राणेंच्या आरोपांवर प्रदेश कॉँग्रेसचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:12 AM