अवैद्य धंद्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 01:40 PM2021-12-29T13:40:01+5:302021-12-29T13:40:40+5:30
या आंदोलनाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली असून त्यांनी याबाबत तातडीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली.
कणकवली : कणकवली पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीन दिवसांचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली असून त्यांनी मांजरेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत याबाबत तातडीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील वागदे येथील साईबाबा सोशल क्लब जुगार अड्ड्यावर कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत साईबाबा सोशल क्लब वागदे येथे स्पर्धा आयोजीत केली होती. या ठिकाणी जुगार चालतो. या बाबत आपण ८ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्याकडे तक्रार केली होती. या स्पर्धेला कणकवली पोलिस स्टेशनचे अधिकारी सागर खंडागळे व शरद देठे पोलिस गणवेशात उपस्थित होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वागदे सरपंच यांनी संबधित क्लबबाबत तक्रार आपल्याकडे तसेच कणकवली पोलिस ठाणे व कणकवली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. असे असताना पोलीस कारवाई करीत नाहीत.
कणकवली पोलिसांनी छापा टाकला. परंतु, अगोदरच माहिती मिळाल्याने तिथे काही आक्षेपार्ह मिळू शकले नाही. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? हे शोधले पाहिजे. सध्या या अवैध धंद्यामुळे कणकवली तालुका हा जिल्ह्यात बदनाम झालेला आहे. म्हणून या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे, असे प्रदीप मांजरेकर यांनी नमूद केले आहे.