कणकवली : नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरातील वीजवाहिन्या अंडरग्राऊंड करण्यात येणार असून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. नगरसेवकांच्या उपस्थितीत वीज महामंडळ तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्यावतीने या बाबत शहरात लवकरच सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अॅड. खोत म्हणाल्या, वीजवाहिन्या अचानक खाली तुटून पडल्याने अनेक दुर्घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत असतो. जनावरे दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून नगरपंचायतीच्यावतीने वीज महामंडळाला तसेच तत्कालिन पालकमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. याला प्रतिसाद मिळाला असून शहरात वीजवाहिन्या अंडरग्राऊंड करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या योजनेबाबत शहरात सर्व्हे करण्यात येणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरपंचायतीने पावले उचलली आहेत. वागदे येथील गोपुरी आश्रम प्रशासनाबरोबर पाच वर्षाचा करार करण्यात आला आहे. तेथील कोंडवाड्यात मोकाट गुरांना ठेवण्यात येणार आहे. तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांना दंड आकारण्यात येणार आहे. त्यांनी वेळेत आपली गुरे न नेल्यास त्यांचा लिलाव करण्याचा निर्णयही नगरपंचायतीने घेतला आहे. शहरातील अद्ययावत मच्छिमार्केटचे काम ७० टक्के झाले असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. या ठिकाणी कोल्ड स्टोअरेजसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी नगरपंचायत कटीबद्ध असून विविध विकासकामे करताना नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी यावेळी केले. (वार्ताहर)शहरातील नळ योजनेचे पाणी नागरिकांना २४ तास मिळावे यासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्याबाबत वीज मंडळाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच वीज मंडळाकडे सन २०११ मध्ये २० लाख रूपये भरण्यात आले आहेत. मात्र अद्यापही वीज मंडळाकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. नगरपंचायतीने निधी वर्ग करूनही वीज मंडळाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी नगरपंचायतीच्यावतीने लेखी पत्राद्वारे वीज मंडळाकडे करण्यात आली आहे.- अॅड. प्रज्ञा खोत, नगराध्यक्षा, कणकवली नगरपंचायत
कणकवलीतील वीजवाहिन्या होणार अंडरग्राऊंड : प्रज्ञा खोत
By admin | Published: February 03, 2015 9:41 PM