सावंतवाडी : सावंतवाडीतील विकासकामांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निधी दिला त्यासाठी मी व आमदार दीपक केसरकर यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच मोठा निधी या जिल्ह्यासाठी येऊ शकला. महाविकास आघाडी सरकारने केसरकर यांनी आणलेली चांदा ते बांदा योजना बंद करून विकासाला खो घातला आहे, अशी टीका भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केसरकर यांना चांगलेच गोंजारत स्तुतिसुमने उधळली, तर तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यामुळे सावंतवाडीतील विकासकामे रखडली, असे सांगत चांगलेच फटकारले. चव्हाण यांच्या बदललेल्या पवित्र्याने सर्वजण अवाक् झाले होते.बुधवारी सावंतवाडी नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण पार पडले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, परिमल नाईक, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, मनोज नाईक, उपसभापती शीतल राऊळ, युवक अध्यक्ष आनंद सावंत आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विकासाबाबत शब्द दिला तो आम्ही पूर्ण करणार, असे परब यांनी सांगितले. यावेळी बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह दर्जावाढ तसेच जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाची माहिती देण्यात आली. यावेळी सावंतवाडी शहरातील तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निधीसाठी माझ्यासह केसरकरांनी पाठपुरावा केलामाजी मंत्री चव्हाण म्हणाले, मुंबईत हक्कभंग समितीची बैठक आहे. या बैठकीला मला जायचे होते. पण नगराध्यक्षांनी केलेली विकासकामे पण तेवढीच महत्त्वाची होती. त्यामुळे त्या बैठकीला गेलो नाही. आमदार दीपक केसरकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला आले नसावेत, असे चव्हाण यांनी सांगितले. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकणच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून सतत पाठपुरावा करणारे मी व केसरकर होतो.