कणकवली: भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपकडून काम सुरू असतानाच आता लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी माजी आमदार प्रमोद जठार हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तसेच तिन्ही विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार नीलेश राणे, सावंतवाडीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तर कणकवलीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभेसाठी निवडणूकप्रमुख म्हणून नियुक्त प्रमोद जठार हे माजी आमदार असून भारतीय जनता पक्षाचे चिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सिंधुदुर्गसोबतच रत्नागिरीमध्येही कार्यरत आहेत. जठार हे भाजपाकडून लोकसभा लढविण्यासाठीही इच्छुक असल्याची चर्चा आहे.