कणकवली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.नारायण राणे यांच्या ' जन संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी कणकवली येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते . ईडी , सीबीआय , कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते .
प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत . तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी . ईडीचा छापा पडला , हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा , मग आम्ही प्रतिक्रिया देऊ ह्व असे नारायण राणे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले .
हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे ! : नारायण राणे यांची टीकासिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्यावर मात करण्यासाठी कोणतीही परिणामकारक व्यवस्था नसल्याने मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही वाढ होत आहे. याला जबाबदार ठाकरे सरकार आहे. हे सरकार कोणाची देणी तसेच मानधनही देत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून हे फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले , जिल्हा नियोजन सभेत झालेल्या निर्णयानंतर परस्पर कामे बदलणे हा पालकमंत्री यांचा अधिकार नाही. पालकमंत्री हा फक्त त्या सभेचा अध्यक्ष असतो. कामे बदलायची असतील तर मतदान घ्यावे लागते. त्यावेळी बहुसंख्येने ठराव मंजूर झाल्यास ते काम जिल्हा नियोजन मधून घ्यायचे असते.मात्र, ते न करता सभा संपल्यानंतर परस्पर कामे बदलून आपल्या पक्षातील लोकांची कामे करायची, हे नको ते उद्योग पालकमंत्री करत आहेत. हे योग्य नव्हे. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. औषधे तसेच डॉक्टर नाहीत. इतर सुविधांची वानवा आहे. राज्यातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे जर कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यात कोणाचा मृत्यू झाला. तर त्याला जबाबदार हे ठाकरे सरकारच आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाच्या आणि आरोग्याच्याबाबतीत दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही बाब आपण तुमच्यासमोर मांडत आहे.ठाकरे सरकार हे फक्त कर्ज माफी बाबत बोलत आहे. मात्र, त्याबाबत काहीच ठोस असे झालेले नाही. हे सरकार कोणाची देणी व मानधन देत नाही . मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत. तसेच कोणताही लोकोपयोगी आदेश किंवा निर्णय सरकार घेत नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.सरकारच जबाबदार राहील !शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक , संबंधित कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत. त्या न करता शाळा सुरू केल्या आणि जर उद्या काही झाले तर त्याला सरकारच जबाबदार असेल.असे राणे यावेळी म्हणाले.