रत्नागिरी : जिल्ह्यातील १० हजार गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी आरोग्यविषयक ध्वनी संदेश मोबाईलवरुन देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद आणि रिलायन्स फाऊंडेशन हे संयुक्तपणे राबवित आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज (शुक्रवारी) मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी परिषद भवनात केला.ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, शहरी विकास आणि संस्कृतीचे जतन या विविध विषयावर सामाजिक, शैक्षणिक आणि सास्कृतिक क्षेत्रात रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यात हजारो मच्छिमार, शेतकरी आणि बागायतदारांसाठी एसएमएसद्वारे अॅलर्ट ठेवण्याचे काम गेले दीड वर्षे रिलायन्स फाऊंडेशन करीत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के विशेष सहाय्य करीत आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश आणि मासेमार, शेतकरी, आरोग्य या विषयावर रिलायन्स फाऊंडेशनने सुरू केलेले काम याबाबत मारुती खडके यांनी माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के, एनआरएचएमचे व्यवस्थापक आनंदा चौगुले, रिलायन्सचे विभागीय व्यवस्थापक दीपक केकन, जिल्हा माध्यम व प्रसिध्दी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, रिलायन्सचे मारुती खडके व अन्य उपस्थित होते. ही सेवा गर्भवती महिला व स्तनदा माता यांना देण्यात येणाऱ्या लसी व आहार याबाबतची योग्य माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर देणेत येणार आहे. तसेच या सेवेमुळे महिलांना घर बसल्या आरोग्यविषयक माहिती मिळणार असून, आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेणेसाठी विविध उपयोगी माहिती रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी सांगितले. (शहर वार्ताहर)
गरोदर महिला, स्तनदा मातांना घरबसल्या ध्वनीसंदेश
By admin | Published: February 05, 2016 10:38 PM