सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील जिमखाना मैदानावर भरवण्यात येत असलेल्या सुंदरवाडी पर्यटन महोत्सवाची धूम अंतिम टप्प्यात आली आहे. आयोजनाची तयारी पूर्ण झाली असून या महोत्सवाचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी होईल, अशी माहिती तालुकाध्यक्ष संजू परब यांनी गुरूवारी दिली.महोत्सवाच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर संजू परब पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युवक अध्यक्ष सनी कुडाळकर, संदीप कुडतरकर, गुरू मठकर, दिलीप भालेकर ,सुधीर दळवी आदी उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, सुंदरवाडी पर्यटन महोत्सव काँग्रेसच्यावतीने प्रथमच आयोजित करण्यात येत असून, हा महोत्सव दर्जेदार व्हावा ही आमची अपेक्षा आहे. महोत्सव पाहण्यासाठी गोवा, कोल्हापूर तसेच बेळगाव येथील रसिक येतील, अशी आमची अपेक्षा आहे. तीस ते चाळीस हजार लोक या मैदानात गर्दी करणार असून, त्या दृष्टीने हे मैदान घेण्यात आले असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.जिमखाना मैदानावर १२० स्टॉलची उभारणी करण्यात आली असून, यातील ७० टक्के स्टॉल हे स्थानिक आहेत. तर उर्वरित ५० स्टॉल बाहेरचे असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. तीन दिवस हा महोत्सव रंगणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पहिल्या दिवशी शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. या शोभायात्रेचे उद्घाटन माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अभिनेत्री नेहा धुपिया उपस्थित राहणार आहे. रात्री गायिका प्राजक्ता माळी, मेघना घाडगे, भुषण कडू, तसेच विनोदी कलाकार भाऊ कदम आदींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेततर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित राहणार आहे. तिसऱ्या दिवशी गायक मिकासिंग याची लाईव्ह कॉन्सेट होणार आहे. पहिल्या दिवशी शोभायात्रेला सायंकाळी पाच वाजता सुरूवात होणार असून शिवाजी महाराज देखावा, विठ्ठल वारकरी समवेत २२ फूट शंकर (पाटेकर दर्शन) उपरलकर देखावा, साटम महाराज देखावा असे पारंपरिक देखावे होणार असून यात शंभर कलाकार सहभागी होणार आहेत, असे परब यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा समारोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणेही येणार असल्याचे परब यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुंदरवाडी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: February 06, 2015 12:11 AM