सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, स्टेज उभारण्याबरोबरच स्टॉल उभारणीचे कामही पूर्ण होत आले आहे. या दोन्ही कामांची नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर यांच्यासह अधिकारी तानाजी पालव, दीपक म्हापसेकर उपस्थित होते. महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीचे आकर्षण असलेला मोती तलावाचा काठ विद्युत रोषणाईने फुलून जाणार आहे.सावंतवाडी पर्यटन महोत्सव २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवासाठी स्टेज उभारणीचे काम सुरू आहे. शनिवारपासून स्टॉल उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तब्बल १४१ स्टॉल उभारण्यात येणार असून, हे स्टॉल जुन्या न्यायालय इमारतीच्यासमोर तसेच धान्य गोडावूनच्या मागे, उद्यानामध्ये लावण्यात येणार आहेत.आतापर्यंत स्टॉल खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांतच सर्वच स्टॉल विक्री झाल्याचे नगरसेवक विलास जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्य व्यासपीठ उभारण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले असून, या कामाची शनिवारी सकाळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाहणी केली. तसेच कामाबद्दल समाधान व्यक्त केले. उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यासपीठ उभारण्याबरोबरच समोर लावण्यात येणाऱ्या खुर्च्या तसेच येणारे मान्यवर यांना कुठे बसवायचे, याची सूचनाही अधिकाऱ्यांना केली आहे. (प्रतिनिधी)कार्यक्रमांची रूपरेषा अद्याप निश्चित नाहीमुख्य कार्यक्रम हा २३ डिसेंबरपासून सुरू होणार असला तरी अद्यापपर्यंत मुख्य कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कोणाला बोलवायचे याचीच चर्चा सुरू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्यांनी अद्याप येण्याचे निश्चित केलेले नाही, तसेच कार्यक्रमाला गायकांसह अन्य कलाकारयेणार याचीही रूपरेषा निश्चित झाली नसून, पहिल्या दिवशी लावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. इतर चार दिवसांचे कार्यक्रम निश्चित झाले नाहीत, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: December 20, 2015 9:49 PM