कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळीसुद्धा पावसाची रिपरिप सुरूच होती. तर सिंधुदुर्गात अजूनही भातकापणी शिल्लक असून या अवकाळी पावसामुळे भातशेती आडवी होऊन नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री वीज चमकण्यासह ढगांचा गडगडाट जोरदार सुरू होता. त्याच्याच जोडीने जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दिवाळीपूर्वी भात कापणी संपविण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. मात्र, पावसाने त्यात व्यत्यय आणला आहे. अनेक ठिकाणी उभे भात पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.
बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते. पुढील काही दिवस सलग पाऊस झाल्यास भात शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. यापूर्वी ज्यांची भातकापणी पूर्ण झाली आहे, ते शेतकरी नुकसानीपासून वाचले आहेत.
- या अवकाळी पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पावसाने परत जोर धरला आहे. - दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांची वाट व्यापारी बघत आहेत. त्यातच जर पावसाने पुढील काही दिवस सातत्य राखले तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. - त्याचप्रमाणे दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन मनोमन केलेल्या नागरिकांचाही हिरमोड होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.