कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत पाच दिवसांपूर्वी भाजपाच्यावतीने लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयावर धडक दिली. यावेळी रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबरोबरच उपजिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियेसाठी पैसे घेत असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला.तसेच जोपर्यंत या विषयाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठाण मांडले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी भेट देत भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, शिशिर परुळेकर, बबलू सावंत, संतोष पुजारे, सचिन पारधिये, गीतांजली कामत, महिला शहराध्यक्षा प्राची कर्पे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पोलीसही दाखल झाले होते.
उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित असलेले डॉ. सतीश टाक यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरत जाब विचारला. तसेच एका वैद्यकीय दाखल्यासाठी डॉ. सतीश टाक यांनी २०० रुपये घेतल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले. या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरणही आपल्याकडे असल्याचे सांगितले. मात्र, डॉ. टाक यांनी त्या दाखला धारक व्यक्तीने माझ्या खिशात हात घातला होता. तो कशासाठी घातला ते मला माहीत नाही. अशी भूमिका घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला .यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी डॉ. टाक हे वारंवार पैसे घेण्याचे प्रकार करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यावर डॉ. पाटील यांनी याबाबत लेखी तक्रार द्या. जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलून या संदर्भात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.शस्त्रक्रियेसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोणी पैसे मागितले तर भाजपाच्या पदाधिकारी किंवा कार्यालयात संपर्क साधावा. त्याची त्वरित दखल घेतली जाईल, असे आवाहन शिशिर परुळेकर यांनी यावेळी केले.शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठकएक तास ठिय्या मांडून बसलेले भाजपा पदाधिकारी आक्रमक झाल्यामुळे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. शाम पाटील हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १५ ची फिरून प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी तेथील दुरवस्था बघून त्यांनी संबंधित प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाने गांभीर्याने घ्यायला हवा होता असे स्पष्ट केले. तसेच शौचालयांची असलेली अस्वच्छता ही बाब योग्य नाही. असे सांगत यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत कणकवलीत मंगळवारी बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.