शिरोडा : महाराष्ट्र राज्य अपंंग वित्त विकास महामंडळ, मुंबई कल्याण डोंबिवली महानगर पालिका, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या सहकार्याने अपंगांच्या दुसऱ्या राज्यस्तरीय कला व साहित्य संमेलनात माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयाचे अपंग कला शिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील यांच्या हस्तकलेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. आचार्य प्र. के. अत्रे कल्याण येथे दोन दिवसांचे राज्यस्तरीय अपंगांचे दुसरे कला प्रदर्शन नुकतेच झाले. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून विविध प्रकारातील कलेचे एकूण १७ स्टॉल सहभागी झाले होते. त्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी या राज्यस्तरीय अपंगांच्या प्रदर्शनात कागदापासून पेपर कुलिंगद्वारे विविध ८० प्रकारचे दागिने, यामध्ये कर्णफुल, नथनी, गळ्यातील हार, बाजूबंध व अंगठी असे विविध नमुने आकर्षकपणे बनविले होते. त्याचबरोबर टाकाऊ सी.डी.पासून विविध शोभेच्या वस्तू, टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून लेडीज पर्स तसेच शिंपले व नारळाच्या करवंटीपासून व मातीच्या विविध वस्तू तयार करून स्टॉलवर मांडल्या होत्या. या सिंधुदुर्गच्या स्टॉलला सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंंत्री संजय सावकारे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर कल्याणी पाटील, अपंग वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक व प्रदर्शनाचे सर्वेसर्वा सुहास काळे, महासंघाच्या उपाध्यक्षा मेघा काळे, तसेच १०० टक्के अंध व्यक्तींनीही तयार केलेल्या वस्तूंच्या स्पर्शाने अनुभूती घेऊन आनंद लुटला. बाळासाहेब पाटील यांनी यापूर्वीही नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, कडगाव, सावंतवाडी व झाराप येथे हस्तकला व फोटोप्रदर्शन केले आहे. कल्याण येथे स्वनिर्मित ४० पोस्टरांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीवर आधारीत प्रदर्शने लावण्यात आली होती. तसेच प्रदर्शनानिमित्त काढलेल्या ‘भरारी’ या पुस्तिकेत ‘प्रवास अपंगांचा-कलाशिक्षक बाळासाहेब पाटील’ असा लेख लिहून कौतुक केले. या माध्यमातून सिंधुदुर्गचे नाव प्रामुख्याने सर्वांच्या तोंडी येत होते. (प्रतिनिधी)
अपंग शिक्षकाच्या हस्तकलेचा गौरव
By admin | Published: August 31, 2014 9:30 PM