आचरा : आचरा आणि परिसरातील ग्रामीण भागांना आरोग्यसेवा देणाऱ्या येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. येथील रुग्णवाहिका चालकाविना बंद असून, अनेक महत्त्वाच्या विभागांतील अधिकाऱ्यांची पदे भरली नसल्याने या केंद्राला अवकळा आली आहे.आरोग्यकेंद्रातील आरोग्य सहायक पद तीन महिन्यांपासून रिक्त आहे. दोन वर्षांपासून सफाई कामगार, तर ८ जूनपासून हिवताप आरोग्य सहायक पद रिक्त आहे. एवढेच नव्हे तर गेल्या नऊ महिन्यांपासून वाहनाला चालक नसल्याने ते बंद आहेत. हे वाहन नादुरुस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. आचरा येथील या प्राथमिक आरोग्यकेंद्रात ४८ महसुली गावातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. बहुतांशी गावे दुर्गम भागात असल्याने त्यांना रुग्णालयात येण्यासाठी वाहनांची गरज पडते. मात्र, वाहनचालक नसल्याने ते वाहन संबंधित रुग्णाच्या गावी पोहोचू शकत नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचा अव्वाच्या सव्वा भुर्दंड गोरगरिबांवर पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वाहनचालक म्हणून येण्यास अनेक उमेदवार इच्छुक आहेत; पण वरिष्ठ स्तरावरून प्रशासकीय कार्यवाही होत नसल्याचे बोलले जात आहे. या केंद्राकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक पदे रिक्त असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वाघ काका मुणगेकर तसेच ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)
आचऱ्याच्या प्राथमिक आरोग्यकेंद्राला अवकळा
By admin | Published: September 25, 2016 11:15 PM