सिंधुदुर्गनगरी , दि. २४ : आॅक्टोबर महिन्याचा पगार देण्याची वेळ आली असतानाही प्राथमिक शिक्षकांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या ३९० मुख्याध्यापकांचे वेतन देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. तसेच संबंधित मुख्याध्यापकांना उर्वरित शिक्षकांची पगार बिले सादर करण्याचे आदेश दिले होते.
मुख्याध्यापकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी स्वत:हून बाजूला होऊन उर्वरित शिक्षकांची वेतन देयके सादर करण्यास नकार दिला आहे. तर प्रशासनाने मुख्याध्यापकांसहीत सादर झालेली पगार बिले नाकारली आहेत.
अतिरिक्त मुख्याध्यापक आणि प्रशासनाच्या या खो-खोच्या खेळात उपशिक्षकांच्या वेतनाचा प्रश्नही रेंगाळला आहे. यासाठी प्रशासनाकडून अतिरिक्त मुख्याध्यापकांच्या वेतनाची आणि भूमिकेची ढाल केली जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. हे अतिरिक्त मुख्याध्यापक चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई का होत नाही? असा सवालही उपस्थित केला आहे.
अतिरिक्त मुख्याध्यापकांची भूमिका व त्यांनी सादर केलेली बिले नियमबाह्य असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. मात्र अन्य उपशिक्षकांचे नाहक थांबविण्यात आलेले वेतन तत्काळ अदा करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका याबाबत सकारात्मक आहे. मात्र शिक्षण विभागाकडून योग्य प्रकारची टिप्पणी योग्यवेळी ठेवली जात नसल्याने हा घोळ निर्माण झाला असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. शिक्षकांचे वेतन २३ आॅक्टोबर पर्यंत न झाल्यास २४ आॅक्टोबर रोजी सर्व शिक्षक संघटना जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष नंदू राणे, राजन कोरगावकर, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष के. टी. चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ही. म. मसके, केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष धोंडू रेडकर उपस्थित होते.