ओरोस : पडवे येथील काजरोबा मंदिराच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण व सिंधुदुर्गनगरी पोलीस पथकाने छापा टाकून रोख ९८ हजार रुपये, तीनपानी पत्ते, खुर्च्या व वाहनांसह १४ जणांना ताब्यात घेतले. कुडाळ तालुक्यातील पडवे काजरोबा मंदिराच्या मागे तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण व सिंधुदुर्ग पोलिसांंच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे प्रल्हाद पाटील, रविराज फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
सिंधुदुर्गनगरी मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर केलेल्या या कारवाईत स्थानिक व जिल्ह्यातील मिळून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक गीतांजली जगताप, आशिष शेलटकर, एस. पी. सुर्वे, ए. एस. गोसावी आदींचा सहभाग होता.