देवगड : देवगडचा पाणी प्रश्न हा गेली कित्येक वर्षापासून प्रलंबितच राहिला आहे. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देऊन सरपंच, ग्रामसेवक व जनतेने जबाबदारी घेऊन संघटीतपणे काम केले पाहिजे. देवगडचा पाणी प्रश्न सोडवणे ही माझी मुख्य जबाबदारी आहे. पाणी प्रश्नाबद्दल पाठविलेल्या प्रस्तावाला निधी मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात देवगड तालुका पाणी टंचाई निवारण कृती आराखडा समन्वय बैठकीच्यावेळी व्यक्त केली.जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये देवगड तालुक्याची पाणी टंचाई निवारण कृती आराखडा समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद वित्त बांधकाम सभापती संजय बोंबडी, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, शेखर जाधव, ग्रामीण पाणी पुरवठाचे अधिकारी, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार नीतेश राणे म्हणाले की, येथील अधिकारी वर्गाची मानसिकता काम करण्याची दिसून येत नाही यामुळेही पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे वा आत्मयितेने काम केले पाहीजे. गेली कित्येक वर्षे देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न हा तसाच राहिला आहे. याकडे २५ वर्षे आमदारकी मिळूनही जीवनाशी निगडीत असलेला पाणी प्रश्न युतीच्या आमदारांना सोडविता आला नाही.मात्र, मी आमदार झाल्यानंतर देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या पाणी टंचाईवरती लक्ष केंद्रीत केले असून हा प्रश्न जबाबदारीने मी सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून जनतेला देण्यात येणारी पाणी प्रश्नाबद्दलची उडवाउडवीची उत्तरे थांबली पाहिजेत. असा कडक इशारा आमदार राणे यांनी अधिकारी वर्गाला दिला. नुसते प्रस्ताव पाठवून काम मंजूरी होत नाही. अधिकारी वर्गांनी त्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला पाहीजे. गावातील जनतेने व सरपंच, ग्रामसेवकांनी जबाबदारीने व जनतेने एक जबाबदारी म्हणून संघटीतपणे काम केले तर देवगडचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो. यामुळे संघटितपणे काम केले पाहीजे. कामामध्ये नियोजनबद्धता बसणे गरजेचे आहे. विकासाच्या वातावरणाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आत्मियतेने काम केले पाहिजे. यामुळे खांद्याला खांदा लावून देवगडचा पाणी प्रश्न सर्वांनी एकत्रित येऊन सोडविला पाहिजे असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)गावच्या सरपंचांनी उपस्थित केले प्रश्नया पाणी टंचाई निवारण कृती आराखड्यामध्ये चांदोशी गावचे सरपंच यांनी आपल्या गावातील होत असलेल्या पाणी टंचाईवरती उपाययोजना करण्यासाठी प्रश्न उपस्थित केला. मोंडपारचे सरपंच दिनेश राणे यांनी मोंडपारमध्ये दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे यामुळे येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील नळ योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. टेंबवली गावचे सरपंच यांनी टेंबवलीमधील विंंधन विहिरीमधील गाळ साफ करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी केली. पाटथर गावचे सरपंच यांनी पाटथर गावामध्ये जुनी नळपाणी योजना जीर्ण झाली असून त्या नळयोजनेची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच मिठबांव गावचे सरपंच यांनी मिठबांवमधिल विहिरींचा व नदीचा गाळ उपसण्यासाठी निधीची गरज असल्याचे त्यांनी हा निधी मिळण्यासाठी कृती आराखड्याच्या बैठकीमध्ये ठराव सूचित केला आहे. याबाबत आता योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
देवगड पाणी प्रश्नाला प्राधान्य
By admin | Published: December 03, 2015 11:18 PM