बागायत (जि. सिंधुदुर्ग) : या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्था तसेच सुरक्षित उपाययोजनांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. यात्रोत्सवाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी आंगणेवाडी येथे आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यात्रा कालावधीत अप्रिय घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, देवालयातील कंट्रोल केबिनमधून नियंत्रण राहणार आहे. यासाठी एस.टी. स्थानक परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात असणार आहेत. भारत संचार निगमकडून तीन टॉवर उभारण्यात येणार असल्याचे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, तहसीलदार वनिता पाटील, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती छोटू ठाकूर, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मंगेश आंगणे, सतीश आंगणे, बाळा आंगणे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
आंगणेवाडी यात्रोत्सवात सुरक्षिततेला प्राधान्य
By admin | Published: February 07, 2016 12:49 AM