कणकवली : महामार्ग चौपदरीकरण दुरावस्थेबाबत सत्ताधार्यांचे दुर्लक्ष आणि सत्तेतील मंत्र्यानी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी खुनाचे गुन्हे दाखल करण्याची दिलेली धमकी या विरोधात सिंधुदुर्गातील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत १६ जुलै रोजी जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
हे जेलभरो कुणाच्या समर्थनार्थ नाही. तर जिल्ह्यातील जनतेसाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेने सहभाग घेऊन सत्ताधार्यां विरोधातील राग व्यक्त करावा असे आवाहन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केले आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेली दिडवर्षे जिल्ह्यातील नागरीक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलने करुन विविध प्रश्नांबाबत आवाज उठवित आहेत. मात्र प्रशासनाकडुन आणि सत्त्ताधार्यांकरुन कोणतीही दखल घेतली जात नाही.