खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण या नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकात एस. टी. महामंडळाच्या गाड्या कमीच, मात्र खासगी लहान-मोठ्या वाहनांचा वावर जास्तच असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे हे बसस्थानक म्हणावे की रिक्षा स्टँड की खासगी गाड्या लावण्याचा वाहनतळ, असा प्रश्न निर्माण होताना दिसतो.खारेपाटण येथे ग्रामपंचायत मालकीची इतिहासकालीन असलेली जुनी धर्मशाळा पाडून त्या ठिकाणी एस. टी. बसस्थानक उभारण्यात आले. ग्रामपंचायतीने ही जागा एस. टी. महामंडळाकडे हस्तांतरण केल्यानंतर इथे नवीन बसस्थानक बांधण्यात आले. मात्र, या बसस्थानकाला खासगी वाहनांनी चारही बाजूनी घेरले असून, रिक्षा चालक बसस्थानक आवारात एकावेळी चार रांगांमध्ये रिक्षा उभ्या करून ठेवत आहेत. त्यामुळे खासगी वाहने उभे करण्याचा वाहनतळ असल्याचे दिसत आहे.
खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने गावात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलकदेखील लावण्यात आले आहेत. तरीदेखील खारेपाटण बसस्थानक येथे वाहनचालक आपली खासगी वाहने उभी करून बिनधास्तपणे जात आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.- सी. पी. कांबळे, वाहतूक नियंत्रण प्रमुख, खारेपाटण