कणकवली : नाटक हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. एखादी नाट्यस्पर्धा ५० वर्षे सातत्याने घेणे ही साधी गोष्ट नाही. राज्य परिवहन महामंडळ हे करू शकत नाही.पण या महामंडळातील अनेक कर्मचारी गुणवंत कलाकार असून त्यांच्यामुळेच स्पर्धेचा हा डोलारा पेलणे शक्य होत आहे.असे गौरवोद्गार राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काढले.महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५० व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा २०२२ - २३ चा बक्षीस वितरण समारंभ व राज्य परिवहन महामंडळाच्या कबड्डी संघाचा सत्कार समारंभ शुक्रवारी कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अण्णा नाईक ही भूमिका करणारे अभिनेते माधव अभ्यंकर,राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी , नाट्य लेखक विलास खानोलकर,सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी व्ही.एस. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.शेखर चन्ने म्हणाले, कोकणच्या मातीत अनेक कलाकार आहेत. तसेच कलाप्रेमी माणसेही आहेत. कोकणातील अनेक कलाकार एसटी महामंडळात कार्यरत आहेत.त्यामुळे चार वर्षे आंतर विभागीय नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळत आहे.त्यामुळेच महामंडळाच्या परंपरेप्रमाणे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कणकवली येथे होत आहे. महामंडळातील कलाकारांनी आपली कला जिवंत ठेवून आपल्याबरोबरच महामंडळाचे नाव उज्वल करावे, असेही ते म्हणाले.विलास खानोलकर म्हणाले, 'दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो' या माझ्या नाटकाला न्याय देण्याचे काम रंगकर्मी सुहास वरूणकर व त्यांच्या कलाकारांच्या टीमने केले आहे. त्यामुळे मला पुन्हा नाटक लिहायची प्रेरणा मिळाली आहे.त्यामुळे लवकरच माझे दुसरे नाटक आपल्यासमोर येईल.असेही ते म्हणाले. पारितोषिक वितरण समारंभानंतर दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
महामंडळातील गुणवंत कलाकारांमुळेच स्पर्धेचा डोलारा पेलणे शक्य, शेखर चन्ने यांचे गौरवोद्गार
By सुधीर राणे | Published: April 22, 2023 2:04 PM