कणकवली : कोणतेही काम करताना संघटित होऊन काम केल्यास त्याचा लाभ सर्वांनाच लवकर मिळतो. शिक्षण क्षेत्रही काही याकामी कमी नाही. शिक्षणक्षेत्राचा विकास हा स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून आपणास पहावयास मिळतो. उच्च शिक्षण समाजात रुजविण्याचे काम हे प्राध्यापकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. विठ्ठल मोरे यांनी केले.फोंडाघाट महाविद्यालयात एमफुक्टोचे कोषाध्यक्ष डॉ. मोरे यांनी ‘शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. सुदर्शन मोरे, प्राचार्य डॉ. मोरे, बुक्टूचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. वसंत शेकडे आदी उपस्थित होतेमोरे म्हणाले, शिक्षण क्षेत्राच्या विकासात सातत्याने होणाऱ्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य आणि पारंपरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था यांना नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्येचे निवारण करण्याकरिता संघटनेची नितांत आवश्यकता आहे. संघटना टिकवून ठेवण्याचे कार्य मात्र तरुणपिढीने केले पाहिजे. एमफुक्टो या संघटनेने ही महाविद्यालयातील प्राध्यापकांना आणि सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना बरेच लाभ मिळवून दिलेले आहेत. मात्र, आज विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना या लाभांपासून शिक्षण पद्धतीने वंचित ठेवलेले आहे. याची गंभीर दखल घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्याकरिता एमफुक्टो ही संघटना प्रयत्नशील राहील, असे आश्वासन प्रा. डॉ. मोरे यांनी दिले.या चर्चासत्रात डॉ. सुदर्शन मोरे आणि डॉ. वसंत शेकडे यांनी, संघटनेची आवश्यकता आणि एकसंघता याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो, असे सांगितले. फोंडाघाट महाविद्यालयाचे प्रा. जगदीश राणे यांनी प्रास्ताविक केले. चर्चासत्राला देवगड, मालवण, कणकवली, वैभववाडी येथील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संतोष बिरनाळे यांनी केले. प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
प्राध्यापकांनी शिक्षण समाजात रूजविण्याचे काम करावे
By admin | Published: January 16, 2015 10:27 PM