कणकवली : हळवल - परबवाडी येथील मुक्ताई महिला बचतगटाने मसाला उद्योग, झेंडूची शेती व सेंद्रिय शेतीची कास धरत आपल्या बचतगटाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. या बचतगटाने झेंडू आणि भातशेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून इतर शेतकऱ्यांमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. या बचतगटाने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल कृषी विभागाने समाधान व्यक्त केले आहे. महिला आर्थिक विकास मंडळाअंतर्गत हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई महिला बचतगटाची वाटचाल सुरू आहे. या बचतगटाच्या अध्यक्षा अस्मिता राणे व सचिव दर्शना परब यांच्या नेतृत्वाखाली हा बचतगट सुरू असून, या बचतगटातील १६ महिलांना हिरकणी लोकसंचलित साधनकेंद्र कणकवलीच्या व्यवस्थापिका सीमा गावडे व उपजीविका तज्ज्ञ स्नेहल कुडतरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बचतगटाचा आर्थिक व्यवहार चांगला व सर्व महिला कार्यतत्पर असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या बचतगटाला ५0 हजारांचे अर्थसहाय करून मसाला उद्योग सुरू करून दिला. या उद्योगात ‘मागणी तसा पुरवठा’ हे तंत्र अवलंबल्याने बचतगटाने या उद्योगात प्रगती केली. बचतगटाने काळाची पावले ओळखून यावर्षी झेंडूच्या फुलांची लागवड केली. बाजारात सणावेळी या झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्यामुळे या बचतगटाने पहिल्याच प्रयत्नात सुमारे २0 हजारांपर्यंत उत्पन्न घेतले आहे. दसऱ्याच्या वेळी या झेंडूच्या फुलांची कणकवलीत विक्री करून या बचतगटाच्या महिलांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. या बचतगटाने ज्यावेळी झेंडूच्या फुलांची लागवड करायची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी हळवल येथे जमीन उपलब्ध करून देण्यात आली. झेंडूच्या रोपांची जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागवड झाली. चार महिन्यांत या झेंडूच्या फुलांचे उत्पन्न मिळाले. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या संतांच्या विचाराप्रमाणे या महिलांनी विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखविले, त्यामुळे या महिला समाजात कौतुकास पात्र ठरल्या आहेत. झेंडूची फुले हा उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून या १६ महिलांची आर्थिक उन्नती होणार आहे. या महिलांनी संसाराला हातभार तर लावला आहेच शिवाय समाजातही आपल्या बचतगटाचे नाव उज्ज्वल केले आहे. भातशेतीतही भरारी या बचतगटातील महिला मसाला उद्योग, झेंडूची फुले हे उद्योग करून थांबल्या नाहीत, तर भविष्यकाळाची पावले ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळल्या आहेत. कोकणात भात पीक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कर्जत-८ या बियाणांची भात लागवड केली. ही लागवड पारंपरिक पद्धतीने न करता कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनानुसार आधुनिक पद्धतीने लागवड केली. त्यामुळे आता कर्जत-८ या भाताच्या रोपांच्या लोंबी तयार झाल्या आहेत. या आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे भाताचे चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वासही या महिलांना आहे. तसेच सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने जमिनीचा कसही वाढणार आहे. भातासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला. शेणखत वापरले. त्यामुळे जमिनीचा कस वाढला. दरम्यान, महिला बचतगटाच्या या आधुनिक शेतीचा आदर्श जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. मसाला उद्योग सुरुवातीला या बचतगटातील महिलांनी मसाला उद्योगाला प्रथम प्राधान्य दिले. बाजारातील मागणीचा विचार करून त्या उत्पादन घेत असल्यामुळे या बचतगटाची आर्थिक स्थितीही मजबूत झाली आहे. बँकेचे अर्थसहाय या बचतगटाचे आर्थिक व्यवहार नीटनेटके असल्याने आयसीआयसी बँकेनेही या बचतगटाच्या महिलांना एक लाख ७0 हजारांचे अर्थसहाय केले आहे. त्यामुळे या बचतगटाला आपल्या पुढील उद्योगासाठी भांडवल उभे करण्यास मदत झाली आहे. या बचतगटाच्या यशस्वी प्रयत्नामुळे महिला बचतगटातील सर्वच सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बचतगटाच्या अध्यक्षा अस्मिता राणे व सचिव दर्शना परब यांचे यशस्वी प्रयत्न आणि इतर सदस्यांच्या सहकार्यामुळे हा महिला बचतगट प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मसाला उद्योगातून साधली प्रगती
By admin | Published: October 15, 2016 11:14 PM