साटेली भेडशी : ग्रामीण भागातील मोलमजुरीचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या महिलांची चर्चेतून एकी झाली. समूहातून काहीतरी करण्याच्या उद्देशाने सर्व महिलांनी बचत गट स्थापन केला. रोज करणाऱ्या मजुरीचीच अनेक कामे त्यांनी संघटितपणे करत स्वत:ची आर्थिक उन्नती साधली. साटेली-भेडशी, थोरले भरड येथील महालक्ष्मी स्वयंसहायता परिवर्तन बचतगटातील महिलांची ही प्रगती इतर महिलांना प्रेरणादायी ठरली आहे. साटेली-भेडशीतील थोरले भेरड येथील महिलांचा मुख्य व्यवसाय हा तसा मोलमजुरीचाच. तालुकाच दुर्गम आणि राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्याने आवश्यक प्रकल्पांच्या अनुपलब्धतेमुळे येथे रोजगाराच्या साधनांची कमतरता आजही कायम आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी येथील महिलांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेतीतील रोजंदारी. मोलमजुरी करणाऱ्या या महिलांना या कामातून दैनंदिन कामासह आवश्यक पैसे मिळत नसल्याने या कामात स्वारस्य राहिले नाही. साहजिकच वाढलेल्या अस्वस्थतेने महिला एकत्र आल्या आणि सामूहिक विचारातून महालक्ष्मी परिवर्तन स्वयंसहायता बचतगटाची निर्मिती झाली. दहा महिलांनी एकत्र येत सुरुवातीला आपली शंभर रुपयांची वर्गणी जमविली. या वर्गणीतून त्यांनी सुरुवातीला स्टेशनरीचे दुकान सुरू केले. परिसरातील महिलांनी सुरू केलेल्या या एकमेव दुकानाला गामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला. साहजिकच या दुकानाची साटेली भेडशीत चर्चा होऊ लागली. दुकानावर समूह अवलंबून राहत नसल्याच्या खात्रीने या महिलांनी नारळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गटाचा हा आणखीन एक आगळावेगळा उपक्रमही ग्रामस्थांसह व्यापारी वर्गाच्या पसंतीस उतरला आणि वार्षिक उत्पन्नाचा चांगला मार्ग या महिलांना मिळाला. सध्या गटातील चौघी महिला हा व्यवसाय करतात. तर गटातील अन्य तिघा महिलांनी समूह शेती करीत महिला बचत गटाचा नवा उपक्रम राबविला आहे. सध्या साडेपाच एकरांत या महिलांनी केळीच्या बागा फुलविल्या आहेत. त्यामुळे गटातील दहाही महिलांनी आपली स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नती साधली आहे. आज गटातील महिलांनी आपल्या इतर बचत गटांपेक्षा जास्तीत जास्त बचत व कमीतकमी भांडवल गुंतवणुकीतून चांगली कमाई केली आहे. शिवाय आपल्या सोयीनुसार कुक्क्ुटपालनाच्या व्यवसायालाही आपलेसे केले आहे. या गटाची स्थापना ११ फ ेब्रुवारी २०१० साली झाली. यामध्ये माधवी महादेव गोवेकर (अध्यक्ष), रुक्साना अबू खान (उपाध्यक्ष), शारदा गुलाबराव मोहिते (सचिव), तर सदस्या म्हणून बेगम रफीक बिडीकर, सरस्वती भीवा धरणे, वैशाली रॉनी फर्नांडिस, सकिना मुस्ताफ्फा सय्यद, राजश्री राजन अंधारी, शरिफा इब्राहिम शेख, सुलोचना सुभाष किनळेकर यांचा समावेश आहे. शंभर रुपयांच्या वर्गणीने पाच वर्षांत त्यांच्याकडे ९१,४५५ रुपयांचा निधी जमला. यातूनच त्यांनी स्टेशनरीचे दुकान सुरू केले. ज्यावेळी गरज पडली त्यावेळी बँक आॅफ इंडियामार्फत त्यांनी सुरुवातीला दहा हजार व नंतर ४० हजारांचे कर्ज घेतले. यातून या महिलांची सुरू असलेली घौडदौड कायम राहिली आहे. सध्या त्यांच्याकडे ५५ हजारांची गुंतवणूक रक्कम शिल्लक असून, शिल्लक कर्ज ३२,००० आहे. तसेच गटाच्या खात्यावरही तेवढीच रक्कम शिल्लक आहे. एकंदरीत या महिलांनी मोलमजुरीला बगल देत सामूहिक ताकदीवर आपली आर्थिक उन्नती साधत शासनाच्या महिला बचत गटाच्या व महिला सक्षमतेच्या चळवळीला यश प्राप्त करून दिले आहे. महिलांच्या या स्वयंरोजगाराची दखल घेत ग्रामपंचायत, पं.स.ने त्यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव केला आहे. शासनाची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे; पण अजूनही महिलांना याचा पुरेपूर लाभ मिळाला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाने विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. तरच महिलांची क्रयशक्ती वापरात येऊन समाजाचा सर्वांगीण विकास होईल. - शारदा गुलाबराव मोहिते, सचिव, महालक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गट, थोरले भरड, साटेली भेडशी.
संघटित शक्तीतून साधली प्रगती
By admin | Published: July 02, 2016 11:26 PM