सावंतवाडी : सावंतवाडी शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वारसा आहे. यापुढे जात साहित्य निर्मितीमध्येही येथील महिलांनी केलेली प्रगती आनंददायी व वाखाणण्याजोगी असल्याचे प्रतिपादन राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी केले. सावंतवाडी न्यू सबनीसवाडा बिरोडकरटेंब येथील रहिवासी उपमा म्हाडेसर यांच्या पैज या कथासंग्रहाचे प्रकाशन राजमाता भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या सोहळ्याचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने राजमाता भोसले यांच्या हस्ते झाला. या प्रकाशन सोहळ्यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, डॉ. जी. ए. बुवा, लेखिका उपमा म्हाडेसर, सीताराम गावडे आदी उपस्थित होते. राजमाता भोसले म्हणाल्या, कथासंग्रहामध्ये लेखिकांनी असेच पुढे येऊन ऐतिहासिक वारसा जपावा. ‘पैज या कथासंग्रहाच्या लेखिका उपमा म्हाडेसर यांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी बबन साळगावकर यांनी उपमा म्हाडेसर यांच्या कथासंग्रहाला शुभेच्छा देत यापुढेही देवाने त्यांना असेच लिखाण करण्याची प्रेरणा व स्फूर्ती द्यावी, असे सांगितले. यावेळी डॉ. जी. ए. बुवा यांनी सांगितले की, राजमातांच्या हस्ते प्रकाशन म्हणजे या कथासंग्रहाला राजमान्यता मिळाल्यासारखे आहे. कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा हा लाखमोलाचा योग आहे. ‘पैज’ मध्ये पैजेचा फटका कसा बसतो, याबाबत अतिशय चांगला धडा म्हाडेसर यांनी सांगितला असल्याचे बुवा यांनी सांगितले. यावेळी लेखिका म्हाडेसर यांनी हा दिवस अतिशय सुखद, आनंदाचा असल्याचे सांगत हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे. पूर्वी थोडेफार लिखाण केले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात काही महत्त्वाच्या जबाबदार्या आल्याने लिखाण बंद होते. आता पुन्हा नव्याने लिखाण सुरू केले असून त्याचे प्रथम फलित म्हणजे ‘पैज’ हा कथासंग्रह असल्याचे सांगितले. त्यांनी श्रीराम वाचन मंदिर व पंचम खेमराज महाविद्यालयाला या कथासंग्रहाची दोन पुस्तके भेट स्वरुपात दिली. (वार्ताहर)
महिलांची प्रगती आनंददायी सत्वशिलादेवी भोसले
By admin | Published: May 25, 2014 12:35 AM