सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मासिक ैबजेट' कोलमडले असल्यामुळे, राज्यात ६ महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराची भरपाई म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी सुचनाही आमदार डावखरे यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.भाड्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंकडून होणारी घरभाडे वसुली किमान ३ महिने पुढे ढकलण्याची सुचना राज्य सरकारने घरमालकांना केली आहे. त्याचबरोबर घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, असे निर्देशही दिले आहेत. राज्य सरकारच्या स्वागतार्ह सुचनेमुळे भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला.कोविड-१९ मुळे भाडेकरूंप्रमाणेच घरमालकांनाही फटका बसला आहे. सर्वच घटकांचे मासिक उत्पन्न घटले असल्यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सर्व मालमत्तांवर ६ महिने करमाफ करण्याचे आदेश दिल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल.
मालमत्ता करमाफी दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी सुविधा देताना अडचण होईल. त्यामुळे राज्य सरकारने मालमत्ता कराची रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना अदा करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे.