सावंतवाडी : आंबोली घाटाचे कायमस्वरूपी संरक्षण व्हावे यासाठी शासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, आंबोली घाटाच्या संरक्षणासाठी १० कोटींचा निधी देण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभियंत्यांच्या बैठकीत मान्य केले आहे. त्यासाठी बांधकाम विभाग प्रस्ताव तयार करीत आहे. या निधीचा वापर आंबोली संरक्षणाबरोबरच पर्यायी मार्गासाठीही करण्यात येणार आहे.आंबोली घाटातील रस्त्यावर पावसाळ्यात दरडी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पाच वर्षांपूर्वी आंबोलीत सर्वांत मोठी दरड कोसळली होती. त्यात घाट रस्ता तब्बल एक महिना बंद राहिला होता. तात्पुरती मलमपट्टी करून सोडून देण्यात येते.आंबोली घाट रस्ता बंद झाल्यास याचा तीन राज्यांवर परिणाम होतो. पुणे व मुंबई येथून गोव्याला जाणारे पर्यटक आंबोली घाटातूनच जातात, तर सिंधुदुर्ग व गोव्यातून बरीचशी माल वाहतूकही आंबोली घाटातून कर्नाटकला होत असते. त्यामुळे हा घाट कायमस्वरूपी सुरू रहावा, यासाठी बांधकाम विभागाने कंबर कसली असून, घाटातील दरडीचे दगड खाली येण्याची ठिकाणे निवडली आहेत. तसेच तेथे संरक्षक भिंती बसवण्याबरोबच स्वीत्झर्लंड जाळ््याचा वापर करण्याचे बांधकाम विभागाने ठरवले आहे.हे करीत असताना मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने बांधकाम विभागाने राज्य शासनाकडे सतत याचा पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला आता यश आले असून, बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आठवड्यापूर्वी मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांची बैठक घेतली आणि आंबोली घाटाच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी १० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. याबाबतचा प्रस्तावही तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)पर्यायी रस्त्याला मान्यता मिळणार आंबोली घाटाच्या संरक्षणासाठी १० कोटी रुपये देत असतानाच त्यात आंबोली घाटाला पर्यायी मार्ग म्हणून केसरी- फणसवडे-चौकुळ या रस्त्याला मान्यता दिली असून, तो रस्ता करण्याबाबत तसेच वनविभागाला पर्यायी जमीन देण्याबाबतही विचार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आंबोली घाटाबरोबरच पर्यायी मार्गाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
‘आंबोली’ला सुरक्षाकवच!
By admin | Published: February 08, 2016 12:03 AM