कुडाळ : केळुस मोबारवाडी येथील देवस्थान म्हातारबा येथे अज्ञाताने केलेल्या बांधकामाश्ी मुस्लिम समाजाचा कोणताही संबंध नाही, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटनेचे समर्थन केलेले नाही. या घटनेचा मुस्लिम समाजातर्फे निषेध करत असल्याचे जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक महंमद शेख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अपप्रवृत्तीवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.केळूस - मोबार भागात धार्मिक भावना दुखावण्याचे कृत्य अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आले होते. केळुस येथील प्रसिध्द देवस्थान म्हातारबा येथे अज्ञातांनी तीन दिवसांपूर्वी कबरसदृश बांधकाम करून त्यावर चादर व गुलाबाची फुले ठेवली होती. याची बातमी गावात पसरताच ग्रामस्थांनी शुक्रवारी निवती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर वेंगुर्ले नायब तहसीलदार सुरेश नाईक यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने निवती पोलिसांनी ते बांधकाम हटविले. त्यानंतर संतप्त जमाव शांत झाला होता. या प्रकारावर सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मुश्ताक महंमद शेख यांनी या प्रकाराशी मुस्लिम समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच हिंदू व मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने समाजकंटकाकडून बांधकाम करण्यात आले होते. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा पोलखोल करुन पोलिसांनी सत्य समोर आणावे. अशा समाजघातकी लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मुस्लिम समाजाकडून 'त्या' घटनेचा निषेध
By admin | Published: December 14, 2014 9:34 PM