कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले आमदार, खासदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी यांच्यावर सरकारने सुडाची कारवाई सुरू केली आहे. यात आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच आमदार नाईक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्यावतीने कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. १८) हा मोर्चा कुडाळ शिवसेना कार्यालयाकडून सकाळी ११ वाजता निघेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक यांच्यासह अतुल रावराणे, विभागीय समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नीलम सावंत, कन्हैया पारकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर, नेत्यांवर सूडाने कारवाई सुरू केली आहे. एकही गुन्हा नोंद नसलेले शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक विजय साळवी, तर गेली पाच वर्षे पोलीस संरक्षणात असलेले नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम.के. मडवी आदींना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने आतापर्यंत ईडी, सीबीआय, आयटी आदी यंत्रणांचा विरोधकांना त्रास देण्यासाठी वापर केला. आता एन्टी करप्शन ब्युरो ही यंत्रणा कामाला लावली आहे.शिवसेना अशा कारवाईंना घाबरणार नाही. मात्र, या प्रवृत्तीचा आम्ही लोकशाही मार्गाने निषेध करणार आहोत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जाईल. आमदार वैभव नाईक यांच्यावर सुरू केलेल्या कारवाईचा निषेध आणि त्यांना समर्थन देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे असेही आवाहन राऊत यांनी यावेळी केले.न्यायालयाचे आभार !मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव आणून ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. पण राजीनामा मंजूर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला असून त्याबद्दल न्यायालयाचे आम्ही आभार मानतो असेही खासदार राऊत म्हणाले.
सरकारच्या दडपशाहीचा निषेध, शिवसेनेचा येत्या मंगळवारी कुडाळमधील एसीबी कार्यालयावर मोर्चा
By सुधीर राणे | Published: October 13, 2022 6:27 PM