अनंत जाधव-- सावंतवाडी तळवणे वेळेवाडी पुलाच्या भूमिपूजनाच्या दिवशी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन करीत आमच्या जमिनीला योग्य किंमत द्या तरच जमिनी देणार असा पवित्रा घेत उपोषणही केले होते. मात्र, त्यांच्यावर आश्वासनाची खैरात करीत त्यांना उपोषणावरून उठवण्यात आले होते. मात्र, परिसरातील ३० जमिनदारांचा आजही या पुलाच्या कामाला विरोध जसाच्या तसा आहे. त्यातच १६ मार्च २०१३ ला कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रकाराचे रेखाचित्र नव्हते. तसेच पूल बांधण्यासाठी पुरेशी जागा आहे का? याची माहितीही घेतली नव्हती, असे असताना ठेकेदाराला मार्च २०१३ मध्येच ८६ लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी काम ५ टक्केही झाले नव्हते. मात्र, याची जोरदार चर्चा जिल्हाभर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मिटवत काम पुढे सुरू केले. तरीही तत्कालीन अधिकाऱ्यांनी पुलाच्या वेलसाठी अनेकवेळा आराखडे बदलले. काहीवेळा तर नदीच्याखाली खडक मिळू लागल्याने कामाचा वेग मंद करण्यात आला होता.त्यातच पुलासाठी एक वेल बांधण्यात आली होती. तर दुसरी वेल बांधत असताना त्याची उंची वाढवण्यात आल्याने बांधकाम विभागाने ती वेल अर्धवट टाकण्यास ठेकेदाराला सांगितले. या कामाच्या दर्जाबाबत पहिल्यापासून शंका होती. पण त्याकडे लक्ष देण्यास कोण अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत होते. कामाचा वेग मंदावला तरी अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर मेहरबान होण्याचे काही सोडले नाही.काम सुरू होण्याआधी ८६ लाखाचा धनादेश दिल्यानंतर मे २०१५ मध्ये पुलाची भिंत तोडल्यानंतरही ठेकेदाराला ७० लाखाचा धनादेश देण्यात आला. हे खरे वैशिष्ट्य. तर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप अर्धवट स्थितीत असून फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रस्त्यावरची माती काढणे, तसेच भराव टाकणे ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत रस्त्यावर खडीकरण किंवा डांबरीकरण झाले नाही. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ६५ लाखाच्या कामापैकी ५४ लाख रूपये पूर्वीच अदा करण्यात आले आहेत.भूसंपादनासाठी वेगळा निधी येणार : अनामिका जाधवतळवणे वेळवेवाडी पुलाचे काम सध्या सुरू असले तरी ते कोणत्याही भूसंपादनाशिवाय सुरू असल्याची कबुली उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी दिली. तसेच कामाच्या निधीमध्ये भूसंपादनाचा भाग येत आहे. भूसंपादनासाठी वेगळा निधी येणार असून यामध्ये ३० ते ३५ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पुलाच्या किंवा जोड रस्त्याच्या कामासाठी कोणताही वाढीव निधी आकारला नसल्याचेही अनामिका जाधव यांनी स्पष्ट केले. नव्याने दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांना काही अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
पुलाच्या कामाला आजही जमिनदारांचा विरोध
By admin | Published: October 21, 2015 9:37 PM