रत्नागिरी : मराठा युवकांनी नोकरीपेक्षा उद्योजक होऊन नोकऱ्या देण्याकडे लक्ष द्यावे. दहावी, बारावीच्या टप्प्यावरच समाजकारणाचे संस्कार होत असतात. आयडॉल बनता आले नाही, तर समाजाचे प्रतिनिधी व्हा, असे आवाहन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दहावी, बारावीतील गुणवंतांच्या कार्यक्रमात केले.विवेक हॉटेलच्या मराठा सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, जिल्हा परिषदेच्या सदस्य नेहा माने, उर्मिला घोसाळकर, सतीश साळवी, महेंद्र साळवी, राजाभाऊ साळवी उपस्थित होते. या कार्यक्रमात मराठा समाजातील दहावी आणि बारावीमध्ये सुयश पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना रवींद्र माने पुढे म्हणाले, मी नववीत असतानाच आमदार व्हायचे ठरवले. आमदार कशाशी खातात, हे मला माहीत नव्हे. मात्र, लहानपणीच समाजकारणाची बिजे पेरली गेल्याने मी तीन वेळा आमदार झालो. अभियंता नसलो तरी आंबव येथील माझ्या कॉलेजमधून दरवर्षी ३०० अभियंते बाहेर पडतात. अलिकडे मुले व्हॉट्सअपवर जास्त वेळ खेळताना दिसतात. तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, असे आवाहनही त्यांनी केले.नेहा माने म्हणाल्या, गुगलमुळे जग जवळ येऊ लागले आहे. या माहितीचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केल्यास प्रगती होऊ शकते. आपले मूल मोबाईलवर काय करते आहे, याकडे पालकांनीही बारीक लक्ष ठेवले पाहिजे. गौरी सावंत हिने सूत्रसंचालन केले. सतीश साळवी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दरवर्षी ३०० कलेक्टर होतीलगुणवंत विद्यार्थिनी पायल घोसाळकर हिने मनोगतामध्ये सांगितले, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी ३०० अभियंता बाहेर पडतात. जिल्ह्यात युपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन केंद्र साकारल्यास येथून प्रतिवर्षी ३०० कलेक्टर तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रतिकूल परिस्थितीत दहावीमध्ये यश मिळवणाऱ्या मनाली सावंत हिला रवींद्र माने यांनी १० हजार रुपयांची व खजिनदार अविनाश खामकर यांनी आर्थिक मदत केली.
उद्योजक बनून रोजगार द्यावा : रवींद्र माने
By admin | Published: June 28, 2015 10:49 PM