कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ज्या शाळांना प्रयोगशाळांची आवश्यकता आहे अशा सर्व शाळांना माझ्या आमदार निधीतून प्रयोगशाळा निर्मितीसाठी निधी देणार, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. तसेच विज्ञान प्रदर्शने ही विद्यार्थ्यांच्या संशोधकवृत्तीला, कल्पकतेला प्रोत्साहन देणारी आहेत, असेही ते म्हणाले. कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिवाजी इंग्लिश स्कूल कुडाळ येथे ४, ५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले असून या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी कुडाळ पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पणदूर सरपंच शामसुंदर सावंत, वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत अणावकर, सुनिता बाकरे, संजय बगळे, प्रकाश ओगले, संजय मालवणकर, संजय कदम, उदय सर्पे, ए. बी. चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती प्रतिभा घावनळकर म्हणाल्या की, विज्ञानाची कास धरून प्रगती केली पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देवू नका. पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्नशील रहा, असा संदेश त्यांनी उपस्थितांना देत विद्यार्थ्यांची विज्ञानामध्ये प्रगती व्हावी यासाठी आम्हा लोकप्रतिनिधींचे नेहमीच सहकार्य लाभेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत म्हणाल्या की, ज्यावेळी प्रश्नांचा शोध घ्यायला लागतो त्याचवेळी आपण विज्ञानाच्या जवळ जात असतो. विज्ञान ही जाणून घेण्याची गोष्ट आहे. शास्त्रज्ञ बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटीची गरज आहे. भविष्यात आपल्या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ घडावेत अशीही त्यांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी बोलताना संजय बगळे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शन म्हटले की, शिक्षकांमध्ये तू तू मै मै होते, खरे तर अशी विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी स्वत:हून कोणही तयार झाले पाहिजे. सर्व प्रकारचा अभ्यास करीत असताना आपण वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासतो हे बघणे महत्वाचे आहे. तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनासाठी स्वतंत्र हॉल आमदार नाईक यांनी बांधावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आभार उदय सर्पे यांनी मानले.विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याचे वैज्ञानिक प्रकल्प, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर वैज्ञानिक साधने, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची वैज्ञानिक व लोकसंख्या शैक्षणिक साधने मांडण्यात आली आहेत. तर उच्च प्राथमिक व माध्यमिक गट निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे व नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
प्रयोगशाळा निर्मितीसाठी निधी देणार
By admin | Published: December 04, 2015 10:48 PM