सिंधुदुर्गनगरी : कातकरी बांधवांच्या घरकुलाचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यांच्यासाठी पक्की घरे व घरकुलांसाठी जागा जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कातकरी मेळाव्यात केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी कातकरी बांधवांचा मेळावा झाला. त्यात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या पेण येथील कार्यालातील प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे, निरीक्षक आनंद पाटील, विजय देवरे, डी. एस. सोनावणे, दीपक पवार, मिटकरी, झाल्टे, तहसीलदार शरद गोसावी, शोषित मुक्ती अभियान संस्थेचे अध्यक्ष उदय आईर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, कातकरी बांधव जिल्ह्यात विखुरलेल्या स्थितीत आहेत. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न महत्वाचा आहे. याबाबत २० ते २५ कुटुंबांना एकत्र जागा दिली जाईल. याबाबत सर्वांनी या मेळाव्यात माहिती संकलित करून प्रशासनाकडे द्यावी. प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे, निरीक्षक आनंद पाटील यांनी आदीवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. शोषित मुक्ती अभियान संस्थेचे अध्यक्ष उदय आईर यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. (प्रतिनिधी) आधारकार्ड नोंदणी करण्याची सुविधा ४ या मेळाव्याच्या निमित्ताने कातकरी बांधवांनी शासनांच्या योजनांची माहिती काळजीपूर्वक समजून घ्यावी. वैयक्तिक लाभाच्या कोणत्या योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो. याचा विचार करून तसे फॉर्म भरून द्यावेत. प्रशासनामार्फत आधार कार्ड नोंदणी करण्याची सुविधा या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. या मेळाव्याला जिल्ह्यातील कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासित केले. अडचणी मांडल्या या मेळाव्यात कातकरी बांधवांच्या वतीने पिंकी बाबल्या पवार, दिलीप वाघमारे, चंद्रकांत निकम यांनी विविध अडचणी मांडल्या. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उदय आईर यांनी या मेळाव्याचा हेतू विशद केला.
पक्की घरे उपलब्ध करून देणार
By admin | Published: September 22, 2016 12:38 AM