बांदा : परप्रांतीय मनोरुग्ण युवकाने आपल्या हात व मानेवर ब्लेडने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहितकुमार मंजीलाल मीना (२८, रा. राजस्थान ) असे त्याचे नाव आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला ओरोस येथे हलविण्यात आले.रोहित आपल्या मित्रांसमवेत राजस्थानहून केरळकडे जाण्यासाठी रेल्वेने निघाला होता. रोहितकुमार हा सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरून बांद्यात आला. दरम्यान, तो दुपारी बांदा पोलीस स्थानकात येत आपणास राजस्थानला जायचे आहे. आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
हा सर्व प्रकार पाहून तो मनोरुग्ण असल्याचे जाणवत होते. त्याच्या हाताला जखम असल्याने बांदा आरोग्यकेंद्रात उपचार करण्यासाठी नेले. उपचार केल्यानंतर उपकेंद्रातील स्वच्छतागृहात त्याने स्वत:च्या हात व मानेवर ब्लेडने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.
पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव यांनी दवाखान्यात धाव घेत त्याच्या भावाशी मोबाईलवर संपर्क केला. राजस्थान येथून भावाला येण्यास चार ते पाच दिवस लागणार आहे. डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी त्याला ओरोस येथे हलविण्याचा सल्ला दिला.