नांदगाव : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होणार हे जवळपास निश्चित झाले असून फ्रान्सच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर डिसेंबर २०१८ पासून हा प्रकल्प सुरू होण्याचे संकेत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व्हावा यासाठी अणुऊर्जाचे महत्त्व व याबाबतचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गात अणुऊर्जा जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती दर्शविणारी एलईडी व्हॅन सध्या जनजागृती करीत आहे. कासार्डे येथे याबाबत माहिती देण्यात आली. भारत सरकारच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. जैतापूर प्रकल्पाला होत असलेला स्थानिकांचा विरोध तसेच याला असणारा राजकीय नेते व पक्षाचा पाठिंबा यामुळे गेली अनेक वर्षे हा प्रकल्प निर्माण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सध्या राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर जैतापूर प्रकल्पाचे काम वेग घेणार असल्याचे दिसत असून केंद्र सरकारच्यावतीने पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फ्रान्सचे परराष्ट्र सचिव ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागाचे सचिव अरविंंद सिंह, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झायग्लेट यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यावर या कामांना वेग मिळत आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत निर्माण होणाऱ्या शंका व अडचणी यावर मात करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने अणुऊर्जा जागरुकता अभियान हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती दर्शविणारी एलईडी व्हॅन रत्नागिरी व सिंधुदुर्गात फिरत आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयामार्फत गावांची निवड केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावात जनजागृती करून ही व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहे. वैभववाडी व कणकवली तालुक्यातील विविध गावात जाऊन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनजागृती केली जाणार आहे. जैतापूर प्रकल्पात दहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचमुळे या प्रकाल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, राजकीय पक्षांच्या प्रचार व्हॅन तयार करण्यात येतात तशाप्रकारे जैतापूर प्रकल्पाची जागृती व्हावी यासाठी ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. (वार्ताहर)अणुऊर्जा, सौरऊर्जा दोनच पर्याय : प्रज्वल नागपूरकरया जनजागृती व्हॅनचे प्रमोटर प्रज्वल नागपूरकर म्हणाले, आम्ही गावागावात जाऊन जैतापूर प्रकल्पाविषयी जनजागृती करीत आहोत. यामध्ये हा प्रकल्प कसा उपयोगी आहे याबाबत एलईडी चित्रफिती, नकाशे, घोषवाक्य यामार्फत माहिती देत आहोत. अणुऊर्जा प्रकल्प हा युरेनियमवर आधारित असून, देशाच्या विकासाचा वेग लक्षात घेता २०५० साली लागणारी वीज व त्याचा पुरवठा यात विजेची तूट राहणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी परंपरागत ऊर्जा प्रकल्पाद्वारेच वीजनिर्मिती करायची झाल्यास मोठ्या प्रमाणात कोळसा व तेल आयात करावे लागेल. १ कोटी ६० लाख टन कोळसा एकतर रोज उपलब्ध होऊ शकणार नाही. यामुळे कोळशावर व तेलावर चालणारी इतर कामे कोलमडून पडतील. यामुळे अणुऊर्जा व सौरऊर्जेचे हे दोनच पर्याय असून, सौरऊर्जेसाठी लागणारे महाकाय आरसे व बॅटरी बसविणे अव्यवहार्य आहे. अणुविद्युत केंद्रातून बाहेर पडणारे उत्सर्जन मेगावॅट उत्सर्जनाच्या तुलनेत नगण्य असते. विविध प्रकारचे नकाशे, कार्टून्स, फोटो व इतर माध्यमाच्या सहाय्याने या व्हॅनमधून अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनजागृती केली जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
‘जैतापूर’साठी जनजागृती
By admin | Published: April 24, 2017 9:43 PM