सावंतवाडी : इको - सेन्सिटिव्ह लोकांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. लोकांना काय हवे आणि काय नको हे जर माहीत नसेल, तर त्याचा काय फायदा? इको-सेन्सिटिव्हचा पुनर्विचार करीत असताना लोकदबावामुळे अजूनही इको-सेन्सिटिव्हबाबत सरकार भूमिका बदलू शकते, असे स्पष्ट मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मंगळवारी येथील पंचम खेमराज महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर स्पष्ट मते मांडली. त्यांच्यासोबत कुलसचिव खान, ‘सिंधुस्वाध्याय’चे प्रमुख विनायक दळवी उपस्थित होते.कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे महाविद्यालयाच्यावतीने राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी स्वागत केले. यावेळी शुभदादेवी भोसले, प्राचार्य दिलीप भारमल, अॅड. सुभाष देसाई, अॅड. प्रमोद प्रभूआजगावकर आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले की, पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे; मात्र, त्याचा म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा अमूल्य खजिना नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून कोकणातील जैवविविधतेचा अभ्यास करणारा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे इको-सेन्सिटिव्ह तसेच प्रदूषणकारी प्रकल्प लादताना शासनाने घाई केली आहे. एखाद्या समितीला जबाबदारी देऊन सुमारे साडेचार हजार किलोमीटर परिसराचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर इको-सेन्सिटिव्ह राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याठिकाणी असणारी विपुल संपत्ती लक्षात घेता गावागावात जाऊन याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने आपल्या धोरणाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.इको-सेन्सिटिव्हबाबत अद्यापही वेळ गेली नसून मीडिया तसेच लोकदबावामुळे आपण आताही इकोसेन्सिटिव्हबाबत सरकार वेगळा निर्णय घेऊ शकते. एखाद्या ठिकाणी जैवविविधता आहे, म्हणून तो गाव सरसकट इको-सेन्सिटिव्ह करावा या मताचा मी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)+परीक्षांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज असून, अनेक विभागातील परीक्षा विभाग हे विद्यापीठाचे असून गेली अनेक वर्षे या विभागात काम करणारे कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे विविध पदे भरणे गरजेची आहेत. ती पदे शासन आता भरणार असून परीक्षांबाबत काही वेगळे निर्णय घ्यायचे आहेत. ते नक्की घेऊ. यापुढे कोणताही गैरप्रकार टाळता येईल असेच काम करून आम्ही दाखवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तळेरे येथील मॉडेल कॉलेजच्या जागेचे हस्तातंरण झाले असून हे मॉडेल कॉलेज येत्या चार वर्षात उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा म्हणावा तसा अभ्यास नाही.इको - सेन्सिटिव्ह तसेच प्रदूषणकारी प्रकल्प लादताना शासनाने घाई केली.शासनाने आपल्या धोरणाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे.गावागावात जाऊन अभ्यास होणे गरजेचे आहे.
लोकदबावाने भूमिका बदलू शकते
By admin | Published: September 23, 2015 9:38 PM