मिलिंद पारकर - कणकवली--निवडणुकीच्या युद्धात विविध स्तरातील उमेदवार उभे राहात असताना तरूण तडफदार उमेदवारांबरोबर ज्येष्ठ उमेदवारही आपले नशीब आजमावून पाहतात. सिंधुदुर्गात कणकवली मतदारसंघातून सर्वांत तरूण उमेदवार ३२ वर्षांचे नितेश राणे आणि सर्वांत ज्येष्ठ ७१ वर्षांचे कुडाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार पुष्पसेन सावंत आहेत. पुष्पसेन सावंत हे गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. जनता पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणात आले. याच पक्षातर्फे निवडणूक लढवून दोन वेळा ते आमदार झाले. मधु दंडवते, बाली किनळेकर यांच्यासमवेत त्यांनी काम केले. पुष्पसेन सावंत हे शेतकरी होते आणि ट्रकचालक म्हणूनही काम करायचे. प्रथम जनता पक्ष, त्यानंतर जनता दलात फूट पडल्यानंतर १९९०च्या आसपास पुष्पसेन सावंत कॉँग्रेसमध्ये आले. नारायण राणे शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुष्पसेन सावंत जुन्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉँगे्रसमध्ये गेले. आता ते राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. कणकवली मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नीतेश राणे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंंगणात उभे राहिले आहेत. त्यांच्याविरोधात मतदारसंघात सर्वांत ज्येष्ठ उमेदवार विजय सावंत आहेत. विजय सावंत हे गेली चाळीस वर्र्षे राजकारणात आहेत. सुरूवातीला शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. रायगड हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. तेथूनच ते विधानपरिषदेवर निवडून गेले. शिवसेनेच्या उदयानंतर त्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी कॉँग्रेस प्रवेश केला. त्यानंतर ते २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेनेत असलेले नारायण राणे विरोधात होते. त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते कॉँग्रेसमधून विधानपरिषदेवर निवडून गेले. आताची ही त्यांची कॉँग्रसमधून विधानपरिषदेची दुसरी टर्म सुरू आहे. योगायोगाने नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांच्याविरोधात विजय सावंत उभे आहेत. नारायण राणेंचा राजकीय पाठिंबा वगळता नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने त्यांच्याकडे राजकारणाचा अनुभव जमा आहे. गेली ९ वर्षे ते स्वाभीमानी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवित आहेत. कुडाळ मतदारसंघातील भाजपाचे विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर आणि अपक्ष उमेदवार देऊ तांडेल या दोघांचे वय ३५ वर्षे आहे. सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वसंत केसरकर यांचे वय ६९ वर्षे असून, ते मतदारसंघातील सर्वांत ज्येष्ठ उमेदवार ठरले आहेत. वसंत केसरकर हे शिवसेनेचे पाळे रोवणाऱ्यांपैकी एक मानले जातात. १९८५ साली त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची ६ हजार २७६ मते पडली होती. तर इंदिरा कॉँग्रेसचे शिवरामराजे भोसले २५ हजार १३५ मते घेत विजयी झाले होते. मतदारसंघातील किशोर लोंढे हे ३३ वर्षांचे अपक्ष उमेदवार तरूण उमेदवार ठरले आहेत.
पुष्पसेन ज्येष्ठ तर नितेश सर्वात तरूण
By admin | Published: October 02, 2014 10:12 PM