रत्नागिरी : शिवसेनेतील एका गटाची ‘हाराकिरी’ हाच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. महायुतीला त्यामुळे या मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याची भावना शिवसेनेच्या वरिष्ठांतही आहे. परिणामी २००४ प्रमाणेच लोकसभा निवडणुकीत मिळालेले या मतदारसंघातील मताधिक्य विधानसभेलाही मिळालेच पाहिजे, अशी रणनीती शिवसेनेने आखण्यास सुरूवात केल्याने लोकसभेची ‘मात्रा’ विधानसभा निवडणुकीत लागू पडणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे रत्नागिरीत अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजयी होत आमदार व आता मंत्री म्हणून उदय सामंत यांनी आपले बस्तान बसविल्याने सेनेची ही ‘राजकीय मात्रा’ निष्प्रभ करण्यात त्यांना यश येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावेळी कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा पराभव करून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी रत्नागिरीची जागा महायुतीला मिळालीच पाहिजे, असा चंग आतापासूनच बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रथमच आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी विधानसभेची जागा मित्रपक्ष भाजपाची आहेच. परंतु राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून, महायुती सत्तेत येण्यासाठी राज्यभरातील अन्य जागांप्रमाणेच रत्नागिरीची जागाही महायुतीकडे असणे आवश्यक वाटते आहे. त्यामुळेच लोकसभेप्रमाणेच निवडणूक ‘स्ट्रॅटेजी’ विधानसभा निवडणुकीत राबविली जाणार असल्याचे संकेत जिल्ह्यात महायुतीकडून दिले जात आहेत. २००४च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अनंत गीते यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३४ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभेत बाळ माने यांना हे मताधिक्य मिळू शकले नाही, त्यामागे ‘हाराकिरी’ हा विषय होता. यावेळीही लोकसभेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सेनेचे राऊत यांना ३१ हजारांवर मताधिक्य मिळाले आहे.यावेळी लोकसभेत भाजपाने सेनेला या मतदारसंघात संपूर्ण सहकार्य दिले. त्यामुळे त्याची परतफेड म्हणून हाराकिरी करणार्यांना ‘खास मात्रा’ दिली जाणार असल्याची सेना गोटातील चर्चा आहे. खासदार विनायक राऊत यांनी तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे. (प्रतिनिधी)
सेनेची ‘मात्रा’ विधानसभेतही लागू पडणार!
By admin | Published: June 06, 2014 12:17 AM