दोडामार्ग : गेल्या पाच वर्षांपासून विनावापर धूळखात पडलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा अखेर सोमवारी गृहप्रवेश झाला. दोडामार्गचे चाळीसावे तहसीलदार म्हणून महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी निवासस्थानाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावत इमारत महसूलच्या ताब्यात घेतली.दोडामार्ग तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी तत्कालीन प्रभारी तहसीलदार विजय तळेकर यांनी पाच वर्षांपूर्वी शहरातील हनुमान मंदिराशेजारी जागा निवडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.
त्यानुसार ही इमारत मंजूर होऊन तब्बल २० लाखांचा निधी खर्ची घालून तहसीलदारांसाठी निवासस्थान इमारत बांधण्यात आली. मात्र, त्यानंतर चार वर्षे ही इमारत विनावापर धूळखात होती. बांधकाम विभागाने ती महसूलच्या ताब्यात दिली नव्हती.त्याचबरोबर महसूल यंत्रणेनेही या मध्यंतरीच्या कालावधीत म्हणावा तसा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा वापरत नसल्याने बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. झाडी वाढल्याने निधीचा अपव्यय होतो की काय अशी भीती व्यक्त होत होती.ती इमारत महसूलच्या ताब्यातमहिनाभरापूर्वीच दोडामार्गच्या तहसीलदारपदी रुजू झालेल्या तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी पाठपुरावा करून निवासस्थान इमारतीचा प्रश्न मार्गी लावला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व सोपस्कार पूर्ण करून घेत इमारत महसूलच्या ताब्यात घेतली. सोमवारी या इमारतीचा गृहप्रवेश करण्यात आला. हिंदू पारंपरिक पद्धतीने ब्राह्मणपूजा करून हे निवासस्थान ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आता तहसीलदारांच्या निवासस्थानाची समस्या मार्गी लागली आहे.