रजनीकांत कदम ल्ल कुडाळ शिवकालीन ऐतिहासिक घोडेबाव विहिरीमध्ये वडपिंपळासहीत इतर रानटी झाडे वाढली असल्याने या ऐतिहासिक विहिरीच्या बांधकामाला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या ऐतिहासिक वास्तू असलेल्या विहिरीच्या जोपासनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार सुचना व तक्रार करूनही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता या ऐतिहासिक विहिरीच्या वास्तुच्या संरक्षणासाठी कुडाळवासीयांनी एकत्र येऊन पुढकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कुडाळ शहरामधील बसस्थानकासमोर व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात शिवकालीन ऐतिहासिक घोडेबाव आतापर्यंत इतिहासाच्या आठवणी जाग्या ठेवत उभी आहे. सध्या, मात्र या विहिरीकडे पाहता खूप वाईट वाटत आहे. कारण या विहिरीकडे काळजी घेणारे प्रशासन योग्य प्रकारे लक्ष देत नाही. या ठिकाणी विहिरीच्या आतमध्ये मोठी होणारी व रानटी झाडे वाढली असून, विहिरीच्या बांधकामाला त्यामुळे धोका पोहोचणार आहे. घोडेबाव विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी त्याकाळी विहिरीच्या पाण्यापर्यंत उतरत जाऊन पाणी काढण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. आजही त्या पायऱ्या आहेत. मात्र, त्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी तसेच पालापाचोळ्याचा कचराही मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत विहिरीची स्थिती पाहता या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. आजूबाजूला कचरा आहे. या विहिरीची कोणीच स्वच्छता करत नाही, हे दिसून येते. तसेच प्रशासन लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रशासन लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या विहिरीच्या आवारातही मोठ्या प्रमाणात झाडांच्या पाला पाचोळा तसचे इतर कचऱ्याचा खच पडला आहे. त्यामुळे या विहिरीचे सौंदर्यच नष्ट झाले आहे. विहिरीच्या परिसराची स्वच्छता कोण करते का? हा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतिम घटका मोजणाऱ्या या विहीरीला अस्वच्छतेच्या आगारात सडत ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनाचे हे दुर्लक्ष आहे की जाणीवपूर्वक टाळाटाळ आहे, असा सवालही नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. दरम्यान, या विहिरीचे ऐतिहासिक घोडेबाव विहीर असे नाव असलेले फलकही विहिरीच्या कठड्यावर काही वर्षांपूर्वी लावलेला होता. आता मात्र तो नामफलक पूर्णपणे नादरूस्त झाला असून, हा बोर्ड बदलण्याचीही तसदी प्रशासनाने घेतली नाही. नवी राहूदे पण आहे तो तरी..... घोडेबावसारख्या ऐतिहासिक वास्तू सद्यस्थितीत प्रशासन बांधू शकत नाही. त्यामुळे आपण अशा प्राचीन वास्तूंची काळजी घेणे तरी आपल्या हातात आहे. याचा तरी विचार करून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्याचे सरकार हे युती सरकार असून, छत्रपती शिवाजी महाराजांंच्या नावाचा वापर करून पुढे चालणाऱ्या सरकारमधील या मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या विहिरीच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांतून नवीन ऐतिहासिक वारसा निर्माण करण्यापेक्षा आहे तो तरी जतन करावा, अशा भावना व्यक्त होत आहेत. या विहिरीमुळे कुडाळवासीयांना पिण्याच्या पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या विहिरीतील पाणी स्वच्छ कसे राहील, याकडेही लक्ष द्यावे. झाडींच्या विळख्यात सापडली विहीर ४घोडेबाव विहिरीमध्ये वड, पिंंपळ, पायरी याचबरोबर मोठी व ज्यांची मुळे एखाद्या बिल्डिंगच्या भागाला देखील तडा पाडू शकतील, अशी रानटी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच झुडपांचीही वाढ होत आहे. ४त्यामुळे या झाडीच्या विळख्यात सापडलेली विहीर दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. ४ विहिरीच्या आवारातच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्याही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. धोक्याची घंटा : कुडाळवासीयांनी एकत्र येण्याची गरज ४विहिरीमध्ये वाढणाऱ्या या झाडांवर उपाययोजना तत्काळ केली गेली नाही, तर या झाडांची मुळे बांधकाम मोडून टाकतील. पाणी मुबलक मिळत असल्याने भविष्यात ही झाडे तोडली, तरी त्यांची मुळे खोलवर गेल्याने पुन्हा पुन्हा ही झाडे जगण्याचा धोका संभवतो. यामुळे विहिरीच्या अस्तित्वालाच मोठा धोका आहे. ४येत्या काही दिवसात या विहिरीच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींनी काहीच उपाययोजना न केल्यास या ऐतिहासिक वास्तूच्या जोपासनेसाठी कुडाळवासीयांना एकत्र येऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. ऐतिहासिक काळाच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या विहिरीच्या जतनासाठी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
‘घोडेबाव’चा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: November 18, 2015 11:17 PM