विनोद परब -- ओरोस --काही दिवसांपूर्वीच नवीन जिल्हा शल्य चिकित्सकांना झालेला अपघात आणि शुक्रवारी तलाठी उत्तम पवार यांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रमुख घटनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्याची वेळ आता आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर खड्डे चुकविताना दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.खड्ड्यांमुळे या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या महामार्गाची योग्य ती देखभाल केली जात नाही. परिणामत: अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कसाल खर्येवाडी, जैतापकर कॉलनी, ओरोस रवळनाथ नगर, जिजामाता चौक, पीठढवळ नदीवरील पूल अशा अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.गेल्या बुधवारी नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी पुण्याहून ओरोसला येत असताना कणकवली वागदे पेट्रोलपंपासमोर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांच्या मोटारीला अपघात झाला. त्यात ते कुटुंबियांसह किरकोळ जखमी झाले. हा अपघात सुदैवाने एवढ्यावरच निभावला. जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला सुरुवातीलाच खड्ड्यांचा असा अनुभव आला.शुक्रवारी कणकली तालुक्यातील जानवलीमधील रतांब्याचा व्हाळ येथे खड्ड्यांमुळेच दुचाकी वाहन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात तलाठी तसेच कवी असलेले उत्तम पवार यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. खड्ड्यांमुळेच त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. खड्डा चुकवत असताना त्यांचा तोल गेला आणि ट्रकला धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटना पाहता सर्वसामान्य नागरिकांना या खड्ड्यांचा किती त्रास होत असेल याची कल्पना येते. या मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. मंत्र्यांच्या नियोजन बैठकीच्यावेळी या मार्गाच्या दुरुस्तीबाबत केलेल्या सूचनांवर अधिकारीवर्ग केवळ मान हलवून काम करण्याचे आश्वासन देतात. त्यानंतर मात्र काहीच होत नाही.खारेपाटणपासून बांद्यापर्यंत महामार्गाची दुरावस्थामुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणपासून बांद्यापर्यंत हजारो खड्डे पडले आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना या महामार्गावरुन ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गाचे कामही ठेकेदाराने निकृष्ट केल्याच्या तक्रारी स्थानिक पुढारी, नागरिकांनी करुनही याकडे संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्यांमुळे दोन महिन्यात दोन बळी आतापर्यंत गेले आहेत. शेकडो चालक जायबंदी झाले आहेत.
महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: July 23, 2016 11:07 PM