सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरातील अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली.
एकीकडे शासन वृक्षलागवडीवर भर देत असताना जिल्हा प्रशासन मात्र वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, झाडांची देखभाल करता येत नसेल तर वृक्ष लागवड का केली जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली आहे.मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या मोकळ्या जागेत नारळ, सुपारी अशी झाडे लावली आहेत. यातील काही झाडांची देखभाल करण्यात आल्याने ती चांगली झाली आहेत. तर काही झाडांकडे अक्षरश: त्या त्या विभागांनी दुर्लक्ष केला आहे.बुधवारी भर दुपारी लागलेल्या आगीत प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेली झाडे जळून खाक झाली आहेत. पाण्याअभावी अखेरची घटका मोजणारी झाडे या आगीच्या भक्षस्थानी पडली.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खर्च केलेला शासनाचा निधी वाया गेला आहे. तशी चर्चाही या ठिकाणी सुरू आहे.पुन्हा त्याच ठिकाणी झाडे लावण्यासाठी आगज्या ठिकाणी बुधवारी आग लागून झाडे जळाली आहेत त्या ठिकाणी दरवर्षी आग लागते आणि झाडे जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या झाडांसभोवतालचे गवत काढण्यात यावे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बुधवारी लागलेल्या आगीत ही झाडे जळाली. मात्र, वारंवार याच ठिकाणी आग लागून झाडे जळत असल्याने पुन्हा याच ठिकाणी झाडे लावण्यासाठी जागा मोकळी व्हावी यासाठी तर आग लावली जात नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.