तळवडे : जनतेने मला जिल्ह्याच्या विकासासाठी निवडून दिले आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे, जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.
सिंधुदुर्गसाठी १२ क्वॉयरचे युनिट मंजूर झाले आहेत. त्यापैकी एक युनिट वेत्ये गावाला देण्यात येईल. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेत्ये येथे केले.वेत्ये येथील नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, तहसीलदार सतीश कदम, प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सरपंच सुनील गावडे, नूतन सरपंच स्नेहा मिठबावकर, नरेंद्र मिठबावकर, रमेश गावकर, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, मोहन गावकर, विजय जाधव, बुधाजी गावडे, सोनुर्ली सरपंच गुुजन हिराप यांच्यासह वेत्ये येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, वेत्ये गावातील ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. कोणतेही काम यशस्वी करायचे असल्यास एकजूट महत्त्वाची आहे. वेत्ये गावातील कोणतेही विकासकाम असो, ते पूर्ण करून दिले जाईल. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज बेकारीचे प्रमाण वाढले आहे. शासनाने अनेक योजना आणल्या आहेत, त्यांचा लाभ घ्या, असे आवाहन केले.
आपल्याला मिळालेल्या पदाचा गावच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग करा. पर्यटन विकास असो किंवा अन्य कोणताही प्रकल्प असो, गाव हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाचा विकास करा. त्यासाठी शासकीय यंत्रणा आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.
ग्रामस्थांतर्फे सत्कारवेत्ये ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे काम बरीच वर्षे रखडले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे वेत्ये येथील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.