मालवण : महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग व गडकिल्ले संवर्धन समिती गडकिल्ले स्वच्छता अभियानाअंतर्गत किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व सेवाभावी संस्था यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘महा’स्वच्छता अभियानाला शिवप्रेमी व किल्लेप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या पर्यटनाची शान असलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर पुरातत्व विभाग व गडकिल्ले संवर्धन समितीच्यावतीने जिल्ह्यात पहिलीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालवणसह जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर येथील सेवाभावी संस्थांनी स्वागतार्ह सहभाग दर्शविला. राज्यातील गडकिल्ले स्वच्छतेतून संवर्धनाचा संदेश या अभियानातून देण्यात आला. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत संयुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील सतरा सेवाभावी संस्था तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहिमेत प्लास्टिक बाटल्या, वेष्टने, पिशव्या यासह किल्ल्यातील गोड्या पाण्याच्या विहिरी, मंदिरे, महाराजांच्या हाताचे व पायांचे ठसे, चुना तयार करण्याची जागा आदी ठिकाणी वाढलेली झाडी-झुडपे प्रामुख्याने हटविण्यात आली. या मोहिमेत शंभराहून अधिक गोण्या कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती प्रेरणोत्सव समिती सचिव विजय केनवडेकर यांनी दिली. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी डॉ. अमर अडके यांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद करून उपस्थित शिवप्रेमींना स्वच्छता कामाची विभागणी करून देण्यात आली. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, तहसीलदार वीरधवल खाडे, बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, बांधकाम विभागाचे प्रदीप पाटील, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, श्रीराम सकपाळ, भाऊ सामंत, गणेश कुशे, दत्तात्रय नेरकर, संजय गावडे, डॉ. रामचंद्र काटकर, अनिल न्हिवेकर, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य हेमंत प्रभू, नागेश कदम, योगेश पटकारे यांच्यासह किल्लेप्रेमी, नागरिक, विद्यार्थी तसेच किल्ले सिंधुदुर्ग रहिवासी संघ, किल्ले प्रवासी होडी व्यावसायिक संघटना, शिवशक्ती पर्यटन होडी संघटना, व्यापारी संघ, आस्था ग्रुप, झेप घे भरारी युवा मंच, रोटरी क्लब, लायन्स-लायनेस क्लब, शिवाजी वाचन मंदिर, सिंधुदुर्ग महाविद्यालय, अध्यापिका महाविद्यालय, मालवण पत्रकार समिती, फोटोग्राफर्स असोसिएशन, मैत्रय प्रतिष्ठान-कोल्हापूर अशा सतरा सेवाभावी संस्था व सुमारे ५०० हून अधिक किल्लेप्रेमी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. राज्यात गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरु झाली असून किल्ल्यांचे संवर्धन करणार असल्याचे डॉ. अडके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळात तालुक्यातील चिंदर येथील भगवंतगड, मसुरे येथील भरतगड, रामगड यासह अनेक किल्ल्यांची डागडुजी, संवर्धन व स्वच्छता केली जाणार आहे. चतु:सूत्री कार्यक्रमांतर्गत किल्ल्यांवर स्वच्छता, किल्ल्यांचे संवर्धन व जतन असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अमर अडके यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी) तालुक्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन होणार शासनाच्या किल्ले संवर्धन समितीच्या माध्यमातून अनेक गड-किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. मालवणसह जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर येथील सेवाभावी संस्थांनी स्वागतार्ह सहभाग दर्शवला. राज्यातील गडकिल्ले स्वच्छतेतून संवर्धनाचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
किल्ले सिंधुदुर्ग येथे राबविले स्वच्छता अभियान
By admin | Published: October 02, 2016 11:27 PM