चिपळूण : कोयना घाटमाथा ते चिपळूण हे २२ कि. मी. अंतर सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘मेरा तेरह रन’, सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरु यांच्यातर्फे जगदीश दमानिया यांच्या नेतृत्वाखाली ९ सदस्यांनी पूर्ण केले. या दौडमधून सदस्यांनी जंगल संवर्धनाचा संदेश दिला. यामध्ये मोहीत रायसोनी, अविनेश सैनी, ब्रिजेश गजारिया, भरत रामनाथ, अजय चौधरी, भरत श्रीनिवासमूर्ती, कर्नल श्रीकृष्ण, अरुंधती राव, जगदीश दमानिया हे सदस्य होते. नेहल जोशी व त्यांच्या १२ व ९ वर्षाच्या लय व ओवी या मुलानी ११ कि. मी. अंतर धावून आपली जंगलाप्रती आस्था व्यक्त केली. सह्याद्रीचे नितीन तांबे, उदय पंडित, सुहास पंडित, विश्वास जोशी यांनी ११ कि. मी. दौड पूर्ण करत जंगल संवर्धनाचा नारा दिला. बहादूरशेख ते चिपळूण या जनजागृती दौड रॅली रुद्र अॅकॅडमीच्या ५० मुले व मुली यांनी संचालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी कोले सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे डॉ. विक्रम घाणेकर यांनी रॅलीला भेट दिली. त्यांच्याहस्ते ‘मेरा तेरह दौड’चे जगदीश दमानिया यांना तर परिक्षेत्र वन अधिकारी कोले यांच्याहस्ते कर्नल श्रीकृष्ण यांचा सत्कार करण्यात आला. संजीव अणेराव, भाऊ पवार, कमलाकर बेंडके यांच्याहस्ते मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सह्याद्री निसर्ग मित्रचे सर्व सभासद या जनजागृती दौडमध्ये सहभागी झाले होते. कैलास देवळेकर व योगीराज राठोड यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. ‘मेरा तेरह रन’ या उपक्रमाअंतर्गत गेल्यावर्षी १३ दिवसात १३ शहरांमध्ये दररोज १३ मैल धावून सामाजिक संस्थांसाठी निधी उभा केला. या उपक्रमातून जमा होणारा निधी सह्याद्रीच्या माझं जंगल या लोकसहभागातून ‘जंगल संवर्धन’ या उपक्रमासाठी खर्च करण्यात येणार आहे. जंगलाचे महत्त्व माणसाला पटू लागले आहे. दरवर्षी येणारे दुष्काळ, महापूर, ढगफुटी हे जंगलाच्या नाशामुळे झाले आहे. जंगलाचे संवर्धन केले तरच यातून माणूस बाहेर पडू शकेल. हे सारे या दौडदरम्यान नागरिकांना सांगण्यात येत आहे. जंगल संवर्धनाचे महत्व सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात १२५ लोक सहभागी झाले होते. रामाशीष जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोयना घाटमाथा ते चिपळूण अंतर पार.सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरू संस्थेचा सहभाग.दुष्काळ, महापूर, ढगफुटी जंगल नाशामुळे.रूद्र अॅकॅडमीच्या ५० मुले आणि मुलींचा सहभाग.दौडदरम्याने जंगल संवर्धनाचे महत्व.
सह्याद्रीच्या जंगल संवर्धनासाठी दौड
By admin | Published: December 25, 2015 10:49 PM