खनिज वाहतूक जहाजाला ग्रामस्थांचा विरोध: आरोग्य तपासणीत जहाजावरील कामगार सुरक्षित, वेंगुर्ला तहसीलदारांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कवेंगुर्ला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातूनही सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी घातलेली असतानाच रेडी पोर्ट येथे इंडोनेशिया येथून मुंबईमार्गे एक जहाज मायनिंग वाहतूककरिता दाखल झाले आहे. दरम्यान, या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आला असून या जहाजाला परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या जहाजावर कॅप्टनसह २१ परदेशी कामगार असून त्यांची तेथे जाऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यांना कोणताही कोरोना संदर्भात त्रास नसल्याने आजपासून बोटीवरील काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या बोटीवर कामासाठी गेलेल्या स्थानिक १३ कामगारांची बोटीवरील काम संपल्यावर आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना घरी पाठवायचे की क्वारंटाईन करायचे याचा निर्णय होईल अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.रेडी पोर्टच्या हद्दीत २८ एप्रिल रोजी खनिज वाहतूक करण्यासाठी मुंबईवरून हे जहाज दाखल झाले आहे. या जहाजावर एकूण २१ कामगार आहेत.
रेड झोन, हॉटस्पॉट असलेल्या मुंबईवरून हे जहाज रेडीत आल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या जहाजाला जोरदार विरोध केला आहे. दरम्यान, यावर असलेले कामगार हे बाहेरील असल्याने या बोटीवर काम करण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक लोकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. मुंबईवरून आलेल्या कामगारांसह अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करा. जहाज भरू देणार नाही. जहाज माघारी पाठवा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी रेडी ग्रामपंचायतीकडे रेडी पोर्टच्या अधिकाºयांना जहाज परत पाठविण्याबाबत पत्र देण्यात यावे अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. तर याबाबत मेरिटाईम बोर्डाशीसुद्धा चर्चा करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी यांची याबाबत भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, आबा कोंडस्कर, बाळा दळवी, माजी पंचायत समिती सदस्य चित्रा कनयाळकर, युवासेनेचे सागर नाणोस्कर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव राणे, ग्रामस्थ संतोष मांजरेकर, श्रीकांत राऊळ, सुमित राणे, भूषण मांजरेकर, सौरभ नागोळकर, अभिजित राणे, सदा धुरी यांच्यासहित रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.
रेडी येथे हे जहाज आल्याने येथील ग्रामस्थांच्या रोजगाराचाही प्रश्न असून काही ग्रामस्थांनी हे जहाज रहावे अशी मागणी केली आहे. यामुळे आपण ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाºयांना पत्र देऊन ग्रामस्थांच्या दोन्ही बाजू मांडल्या असून यावर आपण गावाच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणार असल्याचे रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले आहे.
ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : लोकरेदरम्यान, तहसीलदार लोकरे यांनी माहिती देताना सांगितले की हे जहाज मुंबईवरून आले असून त्याकडे मेरिटाईम बोर्डाचे लक्ष आहे. हे जहाज दाखल होताच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या टीमने बोटीवर जाऊन सर्व कर्मचाºयांची तपासणी केली आहे. त्यांच्या अहवालनुसार त्या कामगारांना कोणताही त्रास नाही. त्यामुळे बोटीवर काम सुरू केले आहे. सात दिवस हे जहाज समुद्रात थांबून खनिज भरणार आहे. या कालावधीत बोटीवरील एकही कर्मचारी खाली उतरणार नाही. तसेच या कामासाठी जे स्थानिक १३ कामगार बोटीवर गेले आहेत. ते काम संपल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरी सोडायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार लोकरे यांनी केले आहे